

पुणे: शेतकऱ्यांच्या अडचणी गंभीर आहेत, पण केवळ आंदोलनांच्या माध्यमातून त्या सुटणार नाहीत. चर्चेतूनच ठोस तोडगा निघू शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक असून त्यांच्या हितासाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. (Latest Pune News)
पुण्यात एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी विदर्भात बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच बच्चू कडू यांच्या सोबत आम्ही बैठक बोलावली होती आणि चर्चेच्या माध्यमातून शक्य त्या गोष्टी सोडविण्याची तयारी दाखविली होती. सुरुवातीला बच्चू कडूंनीही त्यास मान्यता दिली होती; मात्र नंतर लोकसभा अधिवेशनामुळे अडचण असल्याचे सांगून ते बैठकीस येऊ शकले नाहीत. आजही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. आम्ही त्यांना पुन्हा चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.
फडणवीस म्हणाले, कडू यांनी अनेक वेगवेगळे प्रश्न मांडले आहेत. त्या सर्व प्रश्नांचा सखोल आढावा घेऊन रोडमॅप तयार करणे आवश्यक आहे. हे प्रश्न आंदोलनातून सोडविता येतील, अशी परिस्थिती नाही. सरकार तयार आहे. पण संवादातूनच तोडगा निघाला पाहिजे.
'रेल रोको', रास्ता रोको करून नागरिकांना वेठीस धरणे खपवून घेणार नाही फडणवीस म्हणाले, काल आपण पाहिलं, आंदोलनात रस्ते रोखल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. रुग्णवाहिका अडकल्या, पेशंट ओरडत होते. लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अस्वस्थता व्यक्त केली. त्यामुळे माझे आंदोलकांना आवाहन आहे की, अशा प्रकारे जनतेला त्रास देणारे आंदोलन टाळावे. काही वेळा अशा आंदोलनांत काही अपप्रवृत्ती शिरतात, त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. 'रेल रोको' किंवा जनतेला अडचण निर्माण करणाऱ्या कृती या योग्य नाहीत आणि अशा कृतींना परवानगीही दिली जाणार नाही.
शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत; कर्जमाफी थांबवलेली नाही
या वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे त्यांना आधी प्राधान्याने मदत केली जात आहे. कर्जमाफी करताना पैसे बँकांकडे जातात, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे या वेळी आम्ही ठरवले आहे की थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. ते काम आता सुरू झाले आहे. आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही, अशी भूमिका घेतलेली नाही. आजची परिस्थिती पाहता, प्रथम शेतकऱ्यांना आधार देणे अत्यावश्यक आहे. बाकी निर्णय चर्चा करून घेतले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.