

पौडरोड: कोथरूड परिसरातील भेलकेनगर पासुन बदाई चौक डी.पी. रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक अंधारात प्रवास करावा लागत आहेत. हा रस्ता परिसरातील एक प्रमुख मार्ग असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसोबतच सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणारे नागरिक आणि विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Pune News)
रात्रीच्या वेळी संपूर्ण रस्ता काळोखात बुडाल्याने काही ठिकाणी केबल चोरी झाल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच दाट अंधारामुळे महिलांवरील संभाव्य छेडछाड याचा धोका वाढला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही मनपा विद्युत विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे.
कॉलेज, कार्यालय किंवा नोकरीवरून परतणाऱ्या महिलांना अंधाऱ्या रस्त्यावरून जाण्याची भीती वाटते. काही ठिकाणी असामाजिक घटकांचे जमाव दिसत असल्याने असुरक्षिततेची भावना अधिक वाढली आहे.
दिवे बंद असल्याने वाहनचालकांना अडथळे व खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही विद्युत विभागाने केवळ तात्पुरते काम करून जबाबदारी झटकली आहे. कायमस्वरूपी दुरुस्ती केली गेलेली नाही. या रस्त्याचा वापर दररोज हजारो नागरिक करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पथदिवे कार्यरत ठेवणे अत्यावश्यक आहे. जर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आली नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत आहेत.
कोथरूडसारख्या विकसित भागात अशी परिस्थिती असणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याचे नागरिकांचे मत आहे. सुरक्षित, उजळ आणि निर्भय रस्ता देणे ही मनपाची जबाबदारी आहे – आणि ती त्वरित पार पाडली जावी, अशी मागणी नागरिक करत आहे.