

रावणगाव: यंदा हवामान अनुकूल असल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकर्यांनी वेळेवर पेरणी, योग्य खते व कीड नाशकांचा वापर केल्यामुळे कांद्याच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. रावणगाव, नंदादेवी, बोरीबेल, मळद, खडकी, राजेगाव, वाटलूज, नायगाव, खानोटे, स्वामी चिंचोली, मलठण भागातील शेतकर्यांनी यंदा उत्पादन समाधानकारक असल्याचे सांगितले.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पीक खूप चांगले आले आहे. कांद्याची वाढ चांगली झाली असून एकरी सरासरी अडीचशे ते तिनशे पिशवी उत्पादन निघत आहे. कांदा आकाराने मोठा असल्याने साठवणुकीस योग्य आहे. मात्र, उत्पादन वाढल्याने तसेच बाजारातील आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वसुल होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (Latest Pune News)
सध्या स्थानिक तसेच मोठ्या बाजारपेठेत कांद्याला 10 ते 15 रुपये असा भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघत नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. शेतमालाला हमी भाव मिळाला, तरच शेतकरी उभारणी घेईल त्यासाठी शासनाने आता हमी भाव दिला पाहिजे, अशी मागणी शेतकर्यांनी केली. मालाचे उत्पादन समाधानकारक असले तरी बाजारभाव स्थिर नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
कांदा पीक घेताना यंदा बियाणे, रोपे तसेच लागवड व इतर रासायनिक खतांचा खर्च अधिक झाला आहे. कांदा काढून वखारी मध्ये टाकण्यास अधिक खर्च येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाववाढीच्या आशेवर शेतकर्यांना दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
बाजारभाव वाढेना
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर उपबाजार आवार लोणी (ता.आंबेगाव ) येथे मंगळवारी (दि. 12) कांदा लिलाव झाले. एकूण 652 पिशवीची आवक झाली. गोळे कांदे - 140 ते 151 रुपये, सुपर मीडियम कांदे - 100 ते 135 रुपये, गोल्टी बदला कांदा - 40 ते 80 रुपये दहा किलोने विकला गेला. सभापती निलेश थोरात यांनी ही माहिती दिली. सोमवार, बुधवार आणि शनिवारी कांद्याचा लिलाव दुपारी 12 वाजता सुरू होईल, असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.