पौड: वेगरे-निर्गुडवाडी (ता. मुळशी) येथील शेतकरी कोंडिबा रामा मरगळे (वय 70) यांचा मुठा नदीचे उगमस्थान असलेल्या ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. याबाबत सविस्तर घटना अशी की, मरगळे हे आपल्या पत्नीसमवेत वेगरे-निर्गुडवाडी येथे राहतात. त्या ठिकाणी त्यांचे एकमेव कुटुंब आहे.
शेती व पशुपालन हा त्यांचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे मरगळे हे गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 च्या दरम्यान जनावरे मुठा नदी परिसरात चारण्यासाठी घेऊन गेले होते. संध्याकाळी जनावरे घरी आली. परंतु, मरगळे आले नाहीत म्हणून त्यांची पत्नी कोंडाबाई मरगळे यांनी शेजारील वस्तीवर याबाबत माहिती दिली. अंधार व जोरदार पावसामुळे त्यांचा शोध लागला नाही. (Latest Pune News)
दुसर्या दिवशी सकाळी सदाशिव ढेबे, महादेव कोकरे व त्यांचा मुलगा लक्ष्मण मरगळे यांनी ते ज्या ठिकाणी जनावरे घेऊन गेले होते, त्या परिसरात शोधले असता मुठा नदीपात्रालगतच त्यांचा मृतदेह आढळला. जोरदार पावसामुळे नदी व ओढ्याला जास्त पाणी आल्याने वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा अंदाज आहे.
सदर घटनेची माहिती समजताच वेगरे गावच्या पोलिस पाटील यमुना भाऊ मरगळे यांनी याबाबत पौड पोलिसांना माहिती दिली. पोलिस हवालदार वैभव सुरवसे, शिपाई सुशांत गायकवाड, पोलिस पाटील यमुना मरगळे, ग्रामस्थ सदाशिव ढेबे, मल्लिक कोकरे, महादेव कोकरे, चंदू कोळी, सदाशिव गुजर, माजी सरपंच तानाजी मारणे व ग्रामस्थांनी मृतदेह आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
मृतदेह सापडलेले ठिकाण टेमघर धरणाच्या आतील बाजूस आहे. या ठिकाणी रुग्णवाहिका जाऊ शकली नाही. परिणामी, मृतदेह नागरिकांना झोळीत घालून नदी पार करीत पौड या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवावा लागला. शासनाच्या माध्यमातून मरगळे यांच्या पत्नीला मदत मिळावी तसेच वेगरे ग्रामस्थांना मुठा नदीवरील पुलासाठी निधी मंजूर व्हावा, अशी मागणी वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांनी केली आहे.