

पुणे: पुणे आरटीओने मंगळवारी (दि. 17) केलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान बनावट नंबर प्लेट लावून धावणारी एक स्कूल व्हॅन बाणेर, बालेवाडी परिसरात आढळली. ही व्हॅन रस्ता सुरक्षा पथकाने जप्त केली. याप्रकरणी स्कूल व्हॅन मालकावर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरटीओच्या या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेउन आरटीओ अधिकाऱ्यांनी ही स्कूल व्हॅन जप्त केली असून, शासनाची फसवणूक आणि विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोहचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल स्कूल व्हॅन जप्त करून मालकावर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनात आरटीओच्या ’रस्ता सुरक्षा पथक-02’ ने ही कारवाई केली.
बाणेर परिसरात स्कूल बसची तपासणी सुरू असताना, एका बसचा क्रमांक संशयास्पद आढळला. सखोल चौकशी केली असता, या बसवर चक्क बनावट नंबर प्लेट लावल्याचे समोर आले. पथकाने तातडीने वाहन जप्त करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. या विशेष मोहिमेतील पथक क्र. 2 मध्ये मोटार वाहन निरीक्षक स्मिता कोले, तृप्ती पाटील आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कांचन आवारे, शुभम पाटील यांचा समावेश होता.
या कारवाईनंतर अर्चना गायकवाड यांनी शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. शहरातील सर्व शाळांनी त्यांच्याकडील वाहनांची माहिती तत्काळ ीलहेेश्रर्लीीीरषशूींर्ीिपश. ेीस या पोर्टलवर भरणे अनिवार्य केले आहे. वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्याचा अहवाल आरटीओकडे सादर करावा, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
बनावट नंबरप्लेट वापरणे, हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ?पालकांनीही सजग राहून आपली मुले ज्या बसमधून प्रवास करतात, त्या वाहनाची कागदपत्रे वैध आहेत का, याची खात्री करावी. कोणत्याही त्रुटी आढळल्यास तत्काळ आरटीओकडे तक्रार करावी, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे