पुणे; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी सायंकाळी 5.30 ची वेळ… ससूनचे अधिष्ठाता कार्यालय… अधिष्ठाता ऑफिसच्या लँडलाइनवर मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावाने फोन येतो. ससूनच्या आवारातील दोन कँटीन तातडीने बंद करण्याची आदेशवजा सूचना केली जाते…डॉ. ठाकूर यांनी अडचणी सांगत नंतर होकार दिला. मात्र, काही कालावधीतच फोन फेक असल्याचा उलगडा झाला.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी संध्याकाळी कँटीन समितीची बैठक घेतली. चार कँटीनच्या निविदेची मुदत संपल्याने ती बंद करणार असल्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी टप्प्या-टप्प्याने कँटीन बंद करण्याचा निर्णय झाला. दरम्यान, अधिष्ठाता पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स ऑफिसमध्ये आले. त्या वेळी लँडलाइनवर फोन आला.
'मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय. ससूनमधील आरक्यू आणि समाजकल्याण कार्यालयातील कँटीन तातडीने बंद करा आणि नव्याने टेंडर प्रक्रिया राबवा', अशी आदेशवजा सूचनाच दिली गेली. ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना विचारले असता, त्यांनी फेक कॉल आल्याचे सांगत याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगितले. अशा प्रकरणात वेळ वाया न घालवता त्यापेक्षा रुग्णांच्या शस्त्रक्रिया जास्त महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.