

Pune crime news
पुणे : भविष्य सांगून मंत्र देण्याच्या बहाण्याने एका भोंदू ज्योतिषाने तरुणीला एकांतात बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात हा प्रकार घडला आहे. या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ज्योतिषाच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pune crime news)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील संबंधित ज्योतिषाने पत्रिका पाहून मंत्र देतो, असे सांगून पीडित तरुणीला एकांतात बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी त्याच्याकडे गेली. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत ज्योतिषाने मंत्र देण्याच्या ऐवजी तरुणीला एकाएकी मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. यानंतर घाबरलेल्या तरुणीने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ज्योतिषाला अटक केली आहे.