

नारायणगाव: हॉटेलला जेवायला थांबताना गाडीचा दरवाजा बंद न करणे राजगुरुनगर येथील भाजीपाला व्यापार्यास चांगलेच महागात पडले आहे. या कारमधील पाच लाख रुपयांची पिशवी एका चोराने लंपास केली. तो चोर सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील नीलायम हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी कैलास मधुकर गोगावले (वय 45) या व्यापार्याने नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
व्यापारी कैलास गोगावले यांचा भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (ता. 18) दुपारी दोन वाजता गोगावले हे टिंबर मार्केट येथील व्यापार्याकडे उधारीचे पैसे आणण्यासाठी गेले. तेथील व्यापार्यांकडून दहा लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन ते खेड येथील बाजार समितीच्या आवारात आले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र सचिन सुरेश खंडागळे (रा. राजगुरुनगर, थिगळस्थळ, ता. खेड) हे होते.
राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या आवारातून शेतकर्यांच्या भाजीपाला खरेदीची बिल घेऊन ते जुन्नर येथे आले. त्यांनी सावरगाव (ता. जुन्नर) येथील शेतकरी ज्ञानेश्वर लहू पाबळे यांच्याकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम दिली. उर्वरित पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन खेड येथे जाण्यासाठी निघाले.
ते नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या हॉटेल नीलायम येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी थांबले. त्यांनी त्यांची मोटार पार्किंग करताना पैसे असलेली पिशवी सीटखाली ठेवली. नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करून आल्यानंतर मोटारीतील पैसे असलेली पिशवी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, गाडी लॉक न केल्याचा फायदा या चोट्याने घेतला. हा चोरटा हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित व्यापारी जेवायला गेल्यानंतर काही वेळातच चोरटा त्यांच्या गाडीजवळ आला आणि लगेच त्याने गाडीतील पैसे लंपास केले. त्यामुळे या चोरीप्रकरणी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.