
पुणे: वाघोली परिसरात टोळक्यांची दहशत वाढीस लागली असून, बकोरी रस्त्यावर टोळक्याने एका भंगार दुकानवाल्याला तसेच लॉन्ड्री व्यावसायिकाला मारहाण करीत हप्त्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांत सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
सुशील मसाळ (रा. कोलवडी वस्ती), सुरज गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजी बैठा राजक (वय 35, रा. बकोरी रस्ता, वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Latest Pune News)
फिर्यादी यांचे बकोरी रस्त्यावरील मैत्री मार्केट येथे लॉन्ड्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर एकाचे भंगारचे दुकान आहे. बुधवारी (दि. 2) आरोपींचे टोळके भंगारच्या दुकानात आले. त्यांनी भंगार दुकानदाराकडे महिन्याला तीन हजार रुपये हप्त्याची मागणी केली तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्या वेळी दुकानदार टोळक्याच्या तावडीतून निसटला आणि फिर्यादी यांच्या लॉन्ड्रीच्या दुकानाकडे पळत आला. त्या वेळी आरोपींचे टोळके देखील त्याच्या मागोमाग आले. तेव्हा फिर्यादी यांनी ‘तुम्ही त्याला का मारता?’ असे विचारले. त्यावर आरोपींनी ‘उद्या तुझी बारी आहे. उद्या आम्ही तुझ्याकडे येतो’ असे म्हणून धमकी देऊन तिथून निघून गेले.
गुरुवारी (दि. 3) रात्री आठच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या दुकानात होते. तेव्हा आरोपींचे टोळके दुचाकीवरून दुकानावर आले. त्यांनी ’काल तू भंगारवाल्याला वाचवायला का आलास?’ असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच दुकानात घुसून फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या दुकानाची तोडफोड केली. याप्रकरणी वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.