

पुणे : पुढारी वृत्तसेवा
तुम्ही जे करता त्याकडे शेजार्यांचे लक्ष आहे, शेतकर्यांचे लक्ष आहे, तुमच्या पुढच्या पिढीचे लक्ष आहे. त्यामुळे योग्य तेच करा. शेतकर्यांसाठी कायदा व्हावा यासाठी प्रशासनात कार्यरत आणि निवृत्त पदवीधारकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी पदवीधारकांनी किमान एक तरी शेतकरी दत्तक घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 1981 ते 84 या बॅचच्या पुनर्भेट मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साखर आयुक्त आणि याच महाविद्यालयातील 1980-83 या बॅचचे विद्यार्थी शेखर गायकवाड होते. या प्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी किशोर राजेनिंबाळकर यांचा डॉ. मुळीक यांच्या हस्ते वर्गमित्रांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. मुळीक म्हणाले, "कृषीच्या परीक्षांमध्ये कधी गडबड झाल्याचे ऐकले का? पेपर फुटला असे कधी झाले का? आमच्याकडे ज्वारी पेरली तर गहू कधी उगवत नाही. आम्ही योग्य तेच करतो. याच सचोटीने कृषी पदवीधरांनी शेतकर्यांसाठी एकत्रितपणे कार्य करून शेतकर्यांच्या श्रमाला योग्य न्याय मिळावा यासाठी पुढाकार घ्यावा." किशोर राजेनिंबाळकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या जडणघडणीत महाविद्यालयाचे आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. समोर मोठी आव्हाने आहेत, मात्र त्यावर मात करण्यासाठी कृषी महाविद्यालयात मिळालेल्या संस्कारांचा नक्कीच उपयोग होईल, असे सांगत सर्व मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी व्याख्याते गणेश शिंदे यांचे 'कुटुंब आणि आनंद' या विषयावर व्याख्यान झाले.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाविद्यालयीन जीवनात घडलेले अनेक खुमासदार किस्से सांगत कार्यक्रमात बहार आणली. महाविद्यालयाचे प्राचार्य व बॅचचे माजी विद्यार्थी सुनील मासाळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी या मेळाव्यासाठी सहकुटुंब उपस्थित असलेल्या शंभरहून अधिक माजी विद्यार्थ्यांची आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कार्याची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार आयु्क्त अनिल कवडे यांनी केले. दिलीप काशीद व जयप्रकाश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन हणमंतराव मोहिते, अशोक जानराव, संजय फल्ले, राजेंद्र कोंडे, गणपतराव माडगुळकर, ढावरे व पुण्यातील सहकार्यांनी केले.