परेडनंतरही गुंड झाले उदंड! महिलेच्या खुनाचा प्रयत्न

परेडनंतरही गुंड झाले उदंड! महिलेच्या खुनाचा प्रयत्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील गुन्हेगारांना पोलिस आयुक्तालयात बोलावून तंबी दिल्यानंतरदेखील कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न आहे. गाडी पार्क करण्यासाठी जागा दिली नाही म्हणून टोळक्याने गाड्यांची तोडफोड करत त्या पेटवून दिल्या. या वेळी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान दाखविल्यामुळे महिला बचावली. तर दोन दिवसांपूर्वी तरवडे वस्तीमध्ये टोळक्याने दुचाकी वाहनांची होळी केली होती. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या परेडनंतरही गुंड झाले उदंड… असेच काहीसे चित्र आहे.

आकाश सोकीन सोदे (वय 23, रा. चंदननगर), नयत नितीन गायकवाड (वय 19, रा. साईनाथनगर, वडगावशेरी), सूरज रवींद्र बोरूडे (वय 23, रा. उबाळेनगर, वाघोली) आणि विशाल राजेंद्र ससाणे (वय 20, सध्या रा. वाघोली, मूळ रा. तोंडाळी, पाथर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. धीरज दिलीप सपाटे (वय 25, रा. तुकारामनगर, खराडी) याच्यावरही गुन्हा दाखल केला. तर आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत महेश रमेश राजे (वय 28, रा. तुकारामनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीे.
दि. 17 फेब—ुवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास गाडी पार्क करण्यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर धीरज सपाटे आणि त्याचे इतर 13 साथीदार असे 5 दुचाकीवर आले. टोळक्याने राजे यांच्या कारच्या फोडल्या.

नंतर गाडीच्या पुढील सीटवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. राजे यांची भाडेकरू महिला वर्षा गायकवाड या बाहेर आल्या असता आरोपींनी त्यांच्या अंगावरही पेट्रोल टाकून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. या वेळी वर्षा तेथून पळून गेल्याने बचावल्या. या भागात राहणारे लोक त्या ठिकाणी जमा झाले होते. त्यावेळी आरोपींनी 'कोणी मधे आला तर सोडणार नाही,' अशी धमकी दिली. लोक भीतीने पळू लागले व त्यांनी घराचे दरवाजे बंद केले.

गुंडांवरील वचक पडतोय कमी

किरकोळ कारणातून एकमेकांवर खुनी हल्ला केला जातोय. तर भाईला खुन्नस दिली म्हणून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला जातोय. टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जातेय. गोळीबाराच्या घटनांतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक गुंडांवर पोलिसांचा वचक कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मात्र सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय. तर, काही घटनांमध्ये तर थेट गोळीबारापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. ओठावर मिसरूड न फुटलेली मुले कोयत्याचा धाक दाखवू लागली आहेत.

तोडफोडीच्या या प्रकारानंतर तत्काळ गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. तर अन्य चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सुरू आहे.

– मनीषा पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे.

माझ्या घरासमोरील गाड्यांची तोडफोड सुरू होती. मला वाटले फटाके फुटत आहेत म्हणून बघण्यासाठी बाहेर आले असता टोळक्याच्या हातात फावडे, पेट्रोलच्या बाटल्या होत्या. दुचाकीवर पेट्रोल टाकून माझ्याही अंगावर त्यांनी पेट्रोल टाकले मी घाबरून पळाले.

– वर्षा गायकवाड.

तोडफोडीचे प्रकार यापुढे घडता कामा नये. गुन्हा दाखल असलेल्यांवर आम्ही मोक्कासारखी कठोरातील कठोर कारवाई करणार आहोत.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news