पृथ्वीभोवती असू शकतात अज्ञात ‘लघुचंद्र!’

पृथ्वीभोवती असू शकतात अज्ञात ‘लघुचंद्र!’

वॉशिंग्टन : शनी आणि गुरूसारख्या मोठ्या आकाराच्या ग्रहांचे 90 पेक्षाही अधिक चंद्र आहेत. आपल्या पृथ्वीला मात्र एकच चंद्र आहे आणि त्यामुळेच हा 'चांदोमामा' आपला भलताच लाडकाही आहे. मात्र, खगोल शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीभोवती काही अज्ञात 'मिनी मून्स' म्हणजेच लहान आकाराचे चंद्र असू शकतात, ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. अशा 'लघुचंद्रां'वर भविष्यात मानवी वसाहतही होऊ शकेल! तसेच सौरमालिकेचा अभ्यास करण्यासाठी, वेगवेगळे प्रयोग करण्यासाठीही पृथ्वीच्या अशा तात्पुरत्या चंद्रांचा वापर होऊ शकेल.

2006 मध्ये 'नासा'चे साहाय्य असलेल्या कॅटलिना स्काय सर्व्हे या अरिझोनामधील संस्थेने मानवनिर्मित हजारो उपग्रहांच्या गर्दीत एक अनोखी वस्तू पाहिली. या वस्तूचे बारकाईने निरीक्षण केल्यावर आढळले की, हा अवकाशीय कचरा नसून एक नैसर्गिक उपग्रह आहे, जो चंद्राप्रमाणेच पृथ्वीभोवती फिरत आहे. अर्थात, हा कायमचा पृथ्वीभोवती फिरत राहणारा खगोल नसून, तो तात्पुरत्या स्वरूपात या कक्षेत आलेला आहे. या 'मिनी मून'ला '2006 आरएच120' असे नाव देण्यात आले. त्याचा व्यास अवघ्या काही मीटरचा होता. हा लघुचंद्र केवळ वर्षभर पृथ्वीभोवती फिरत होता व नंतर तो आपल्या मार्गाने पुढे निघूनही गेला. त्यानंतर 2020 मध्येही संशोधकांनी अशाच एका मिनी मूनचा शोध लावला. त्याला '2020 सीडी 3' असे नाव देण्यात आले.

एखाद्या छोट्या कारइतक्या आकाराचा हा खगोल चंद्राप्रमाणेच पृथ्वीभोवती फिरत होता व मार्च 2020 मध्ये तो बाहेर पडला. अशा लघुचंद्रांमुळे आता आणखीही काही अज्ञात लघुचंद्र पृथ्वीभोवती फिरत असावेत, असे संशोधकांना वाटते. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील प्लॅनेटरी सायन्सचे प्राध्यापक रिचर्ड बिन्झेल यांनी सांगितले की, मानव अद्यापही आंतरग्रहीय प्रजाती बनलेला नाही. पृथ्वीशिवाय अन्य खगोलांवर तो कसा राहू शकतो, हे समजलेले नाही. मंगळावर मानवी वसाहती स्थापन करण्याचे स्वप्न आता पाहिले जात आहे. मात्र, तत्पूर्वी असे लघुचंद्र किंवा 'बेन्नू'सारख्या काही लघुग्रहांवर राहण्याचा अनुभव मानवाने घ्यायला हवा. 'ओसिरिस-रेक्स' मोहिमेत 'बेन्नू' या लघुग्रहावरून तेथील खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले आहेत. सध्या त्यांचा अभ्यास सुरू आहे.

logo
Pudhari News
pudhari.news