

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हवामान विभागाने मान्सून लांबण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकर्यांपुढील अडचणींत वाढ झाली आहे. जूनचा एक आठवडा उलटून गेला, तरीही पावसाला सुरुवात झाली नसल्याने उन्हापासून बारामतीकरांची सुटका होताना दिसत नाही. बारामती तालुका उन्हाच्या तीव्रतेने अक्षरशः होरपळून गेला असून, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस लांबल्याने बाजरी, सोयाबीन तसेच उसाच्या लागण हंगामावर परिणाम होणार आहे.
पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने पिकांची काळजी कशी घ्यायची? असा प्रश्न शेतकर्यांपुढे उभा आहे. विहिरींची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. उपलब्ध पाणीसाठा कमी होऊ लागल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला असून, उपलब्ध चार्याचे दर गगणाला भिडले आहेत. उन्हाळी चारा पिकांबरोबर भाजीपाला, तरकारी पिकेही वाढत्या उन्हाने कोमेजून गेली आहेत. सुरुवातीलाच हवामान विभागाचा पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बारामती तालुक्यात मे महिन्यात उन्हाने कहर गेला. मागील कित्येक वर्षांचे रेकॉर्ड मोडले गेले. अवकाळी पावसाची भिस्त असलेल्या शेतकर्यांना अवकाळीनेही साथ दिली नाही. जून महिन्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असल्याने लांबणीवर पडलेला पाऊस शेतकर्यांची काळजी वाढविणार आहे. बदलत्या हवामानामुळे पिके उभारी घेत नसल्याचे व वेगवेगळी औषधे वापरूनही पिकांवरील मावा, कीड, अळी जात नसून, तरकारी पीक परवडत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. कांद्याला बाजारभाव नसल्याने उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसत नाही.
दुष्काळी परिस्थितीशी तोंड देत शेतकरी कसातरी सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच बाजारभावाचा अभाव, शेती उत्पादनातील घट, लांबणीवर पडलेला पाऊस आदी कारणांमुळे शेतकरी बेजार झाला आहे. हवामान बदल शेतकर्यांच्या पाचवीलाच पूजला आहे. हवामान विभाग पावसाबाबत अचूक माहिती देत नसल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा