

पुणे: वेळ रात्री दहाची... कोरेगाव पार्कमधील एका पबमध्ये तरुणांची मोठी गर्दी...पुढारी प्रतिनिधी : एंट्री फी किती आहे? कर्मचारी : कपल एंट्री फ्री आहे. हे सांगताच त्याने प्रतिनिधीला पबमध्ये प्रवेश दिला.
या वेळी वयाचा कोणताही पुरावा (कागदपत्र) न तपासता त्याने आत जाण्यास सांगितले. आत गेल्यावर मद्य ऑर्डर करतानाही कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा ओळखपत्र तपासण्यात आले नाही किंवा कुठेही नियमावलीचा फलकही पाहायला मिळाला नाही. तरुणाईला मद्य देताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले. (Latest Pune News)
हे चित्र फक्त एका पबचे नाही तर कोरेगाव पार्कमधील काही पबमध्ये असेच चित्र आहे. दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने शुक्रवारी (दि.16) रात्री येथील पबची पाहणी केली असता तरुण-तरुणींना वयाचा कोणताही पुरावा न तपासताच पबमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे दिसून आले. तर, कुठेही नियमावलीचे फलकही लावण्यात आले नसल्याचे पाहायला मिळाले.
काही पबमध्ये कपल एंट्री विनामूल्य आहे तर काही ठिकाणी दोन हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. पण, दोन-तीन पबची पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची कागदपत्रे तपासली जात नसल्याचे प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत पाहायला मिळाले. तसेच, रात्री एक वाजल्यानंतरही पब सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिसांची गस्त...
पबमध्ये तरुण-तरुणींची गर्दी होती. पण, महत्त्वाचे पोलिसांमार्फत ठिकठिकाणी पोलिस पेट्रोलिंग करताना पाहायला मिळाले. पोलिसांकडून खबदारी म्हणून प्रत्येक पबच्या बाहेर पेट्रोलिंग करण्यात येत असल्याचे दिसून आले.
पहिल्या पबचे असे होते चित्र...
दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने रात्री दहा वाजता कोरेगाव पार्कमधील काही पबमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. एका नामांकित पबमध्ये त्या वेळी आयटी कंपनीची पार्टी सुरू होती. प्रतिनिधीने विचारले कपल एंट्री किती रुपयांना? त्यावर येथील कर्मचार्याने कपल एंट्रीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील.
पण, आज गर्दी असल्याने अर्धा तास थांबावे लागेल, असे सांगितले. त्यावर प्रतिनिधीने थांबायचे ठरवले. जेव्हा पबमध्ये बुकिंगची वेळ आली तेव्हा त्यांनी वयाचा कोणताही पुरावा असलेली कागदपत्रे मागितली नाहीत आणि आत प्रवेश देण्यास तयारी दर्शविली...
कागदपत्रांची तपासणी नाहीच
तिसर्या पबमध्ये कोणतेही शुल्क न देता प्रतिनिधीने पबमध्ये प्रवेश केला. त्या वेळी वयाचा पुरावा असलेली कागदपत्रे तपासण्यात आली नाहीत. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जोराने वाजणारे संगीत, डान्स फ्लोअरवर हातात मद्याची बाटली घेऊन नाचणारी तरुणाई असेचित्र होते. तरुण-तरुणी येत होते आणि कोणताही वयाचा पुरावा न तपासता आत प्रवेश दिला जात असल्याचे दिसून आले.