

खेड शिवापूर: वेळू (ता. भोर) व खेड शिवापूर (ता. हवेली) या परिसरातील उद्योजकांना विस्कळीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. सतत होणार्या या विजेच्या समस्येमुळे उद्योजकांसह स्थानिक नागरिकही त्रस्त झाले आहेत.
त्यामुळे संतप्त झालेल्या या उद्योजकांनी सोमवारी (दि. 28) सकाळी वेळू येथील महावितरण कार्यालयाला घेराव घालून अधिकार्यांना जाब विचारला. मात्र, अधिकार्यांनाही समस्येचे निराकरण करता आले नाही. त्यामुळे आंदोलक आणखीच संतप्त झाले होते. (Latest Pune News)
वेळू आणि खेड शिवापूर परिसरात अनेक छोटे मोठे उद्योग आणि कंपन्या आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून या भागात अपुरा आणि विस्कळीत वीजपुरवठ्याचा या उद्योगांना सामना करावा लागत आहे. त्यासाठी नवीन वीज उपकेंद्र प्रस्तावित आहे.
त्यासाठी गेल्या दीड वर्षापूर्वी वेळू येथे ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अद्याप या उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे विजेच्या समस्येला स्थानिक नागरिक आणि उद्योजकांना रोज सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभमीवर वेळू येथील स्वराज्याचे शिलेदार संघटना, या भागातील उद्योग व्यावसायिक आणि इतर ग्रामस्थांनी वेळू येथील महावितरण कार्यालयाला सोमवारी सकाळी घेराव घातला. या वेळी महावितरणच्या प्रस्तावित उपकेंद्राचे काम कुठे रखडले आहे, याबाबत विचारणा केली. त्या वेळी अधिकार्यांना त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे दिसून आले.
या वेळी स्थानिक ग्रामस्थ आणि महावितरणच्या शासकीय कंत्राटदार असोसिएशनचे योगेश घोरपडे यांनी संबंधित ठेकेदार आणि इतर महावितरण अधिकारी यांना फोन करून या उपकेंद्राच्या कामाची सद्य:स्थिती उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, तत्पूर्वी स्वराज्याचे शिलेदार संघटना व उद्योजकांनी ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा देत आंदोलन केले. आगामी आठ दिवसांमध्ये ही समस्या न सोडविल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा उद्योजकांनी याप्रसंगी दिला.
या वेळी कार्यकारी अभियंता देविदास बैकर, उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनचळे, वेळू कार्यालयाचे अभिजित भोसले यांच्यासह स्वराज्याचे शिलेदार संघटनेचे राहुल पांगारे, अजिंक्य पांगारे, गुलाब चौबे, शेखर पांगारे, अॅड. संतोष शिंदे, भोरचे माजी उपसभापती अमोल पांगारे, भोर खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष हिरामण पांगारे, उद्योजक जीवन धनावडे यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.