

पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून बी.ई./बी.टेक. (चार वर्षे) आणि पाच वर्षांच्या मास्टर्स अभ्यासक्रमासाठी तसेच एमबीए प्रवेश नोंदणी प्रक्रिया आज शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी 12 जुलैला तर हरकती विचारात घेत अंतिम गुणवत्ता यादी 17 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
यंदा एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 16 आणि 17 जून रोजी जाहीर झाल्यानंतर दहा दिवसांनी ही प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी यंदा कागदपत्रे पडताळणीसाठी दोन पर्याय आहेत असणार आहेत. (Latest Pune News)
ई-स्क्रुटिनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटिनी. ई-स्क्रुटिनीसाठी अर्जदाराने ऑनलाइन फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. ही पडताळणी स्क्रुटिनी केंद्राकडून ऑनलाइनच केली जाईल. प्रत्यक्ष स्क्रुटिनीसाठी, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या सुविधा केंद्रावर उपस्थित राहून अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित या अनिवार्य विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि वैकल्पिक विषयांसह किमान 45 टक्के गुण (मागासवर्गीयांसाठी 40 टक्के) मिळविले असणे आवश्यक आहे.
तसेच, एमएचटी-सीईटी किंवा जेईई मेन्स परीक्षांमध्ये वैध गुण मिळवणे आवश्यक आहे. सीईटीसाठी पूर्वीच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नाही. इतर विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 1 हजार रुपये, तर आरक्षित प्रवर्ग/दिव्यांग/ट्रान्सजेंडर प्रवर्गासाठी 800 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
...असे आहे वेळापत्रक
विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी : 28 जून ते 8 जुलै
कागदपत्रांची पडताळणी : 30 जून ते 9 जुलै
प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी : 12 जुलै
यादीवर हरकती व तक्रार : 13 ते 15 जुलै (सायंकाळी 5 पर्यंत)
अंतिम गुणवत्ता यादी : 17 जुलै
पसंतीक्रम व पुढील गुणवत्ता फेरींचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार.
पीसीबी स्पर्धा अधिक तीव्र
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 90 ते 99.99 पर्सेंटाईल गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या 4,471 ने वाढली आहे. यंदा पीसीएम गटातून तब्बल 4,22,663 विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले आहेत. 70 ते 80 पर्सेंटाईल मिळवणार्यांची संख्या देखील 5,718 ने अधिक आहे. त्यामुळे उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा तीव्र होणार आहे.
गेल्या वर्षी दीड लाखाच्या आसपास प्रवेश
गेल्या वर्षी एकूण 1,49,078 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेश घेतला होता. प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये 20 हजार जागांची वाढ झाली होती. यंदाही सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी असण्याची शक्यता आहे.
एमबीए प्रवेशही आजपासून
एमबीएसाठीची सीईटी 1 ते 3 एप्रिल या कालावधीत सहा सत्रांमध्ये झाली. एमबीए सीईटीसाठी राज्यभरातून विक्रमी 1,57,281 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 1,29,131 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. या प्रवेशाची नोंदणीही आजपासून सुरू होत आहे. ही नोंदणी 8 जुलैपर्यंत सुरू असणार आहे.