

पुणे: राज्याच्या जलसंपदा विभागाच्या कॅनॉलच्या बाजूला तसेच नदी आणि धरण क्षेत्राच्या लगत मोठ्या प्रमाणात बंगले आणि घरे बांधली जात आहेत. त्याचे सांडपाणी धरणात येत आहेत. ही सर्व अनधिकृत अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. नदी, कॅनॉलवरील अतिक्रमणे काढण्यासाठी ड्रोन सर्व्हे करणार आहोत. त्यानंतर तातडीने ही सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली.
पुणे महापालिका वर्षाला किती पाणी वापरते, या बद्दल जलसंपदा विभागाने माहिती मागवली होती. या संदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.28) पुणे महापालिकेत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. (Latest Pune News)
राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अनेक हॉटेल व रेस्टॉरंट झाल्यामुळे त्यांचे पाणी थेट धरणात सोडले जात आहे. परिणामी, धरणात दूषित पाणी येत आहे.
त्यामुळे कालवा व धरण परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी आता महानगर पालिका आणि जलसंधारण अधिकार्यांच्या मदतीने ही कारवाई केली जाणार आहे. त्या पूर्वी जलसंधारण विभागाची मोजणी पूर्ण करण्यात येईल. या साठी ड्रोनने सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई तीव्र करण्यात येईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
पुण्याच्या दूषित पाण्यामुळे उजनीचे प्रदूषण
पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. हे पाणी थेट नदीत सोडले जाते. हेच पाणी पुढे उजनी धरणात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. त्यामुळे नदीत पाणी सोडण्यापूर्वी या पाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुण्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेशा प्रमाणात एसटीपी प्रकल्प उभारायला हवे, असे जलसंपदामंत्री विखे- पाटील म्हणाले.