Pune : शिरूरला नैसर्गिक ओढे नाल्यांवर बिल्डरांचे अतिक्रमण
शिरूर : शिरूर आणि परिसरात बिल्डरांनी घातलेल्या धुमाकुळातील सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे शहरातील नैसर्गिक असलेले ओढे, नाले या बिल्डरांनी दाबून टाकत त्यावर इमारती उभारत ते गिळंकृत केले आहेत. शिरूर शहरात तीन ते चार नैसर्गिक ओढे, नाले होते, त्यातून पावसाचे पाणी अथवा सांडपाणी वाहत होते. मात्र नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा मिलीभगतमुळे हे ओढे बिल्डरांनी पूर्णपणे दाबून टाकले आहेत. सध्या ओढे, नाल्यांचे काहीच अस्तित्व शिल्ल्क राहिलेले नाही. भविष्यात जर मोठा पाऊस झाला तर शहरात पाणी शिरून मोठा अनर्थ घडू शकतो, याला जबाबदार कोण या शिरूर नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी जर वेळेत कारवाई केली असती तर पुढचा अनर्थ टळला असता. नगरपालिकेला खरे तर आताही कारवाई करता येऊ शकते, परंतु नगरपालिका प्रशासन या बिल्डरांचे बटीक बनले आहे. शिरूर शहर व उपनगरात जमिनीला आलेल्या सोन्याचा भाव यामुळे दलालांचा सुळसुळाट झाला आहे.
संबंधित बातम्या :
शासनाचा कुठलाही अंकुश नाही
अनेक बिल्डरांनी 'ओपन स्पेस' जी सोसायटीसाठी राखीव असते, जिचा वापर मंदिर, क्रीडांगण अन्य सुविधांसाठी होत असतो अशा एक एकरसाठी पंधरा गुंठ्यात राखीव असलेल्या जागाही गिळंकृत केल्या असून या जागेवर मोठी व्यापारी संकुल, इमारती उभारल्या आहेत. या माध्यमातून करोडो रुपयांची शासनाची फसवणूक करत ते खिशात घातले आहेत. अनेक बिल्डरांनी लाखो रुपये प्रशासनात फिरवून आपल्याला हवे तसे बांधकाम करून घेतले असून ना त्यात ड्रेनेजची सोय, ना पाण्याची, ना रस्त्याची सोय अशी अवस्था आहे. अनेक ठिकाणी ' रेरा'चे कायद्याचेही उल्लंघन झाले आहे. शासनाचा कुठलाही अंकुश शिरूरच्या बिल्डरांवर राहिलेला नाही, असे चित्र आहे. अनेक बिल्डरांना प्रशासन आपल्या खिशात असल्यासारखे वाटत आहे. सर्व नियमांची पायमल्ली या ठिकाणी होत असताना केवळ पैशांच्या जोरावर सर्वच शासकीय यंत्रणा वाकवणार्या या बिल्डरांवर कधी कारवाई होणार, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

