सरकारला सद्बुद्धी मिळो : मनोज जरांगे पाटील | पुढारी

सरकारला सद्बुद्धी मिळो : मनोज जरांगे पाटील

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा :  जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन सरकारला मराठा आरक्षणप्रश्नी सद्बुद्धी द्यावी, असे साकडे घातले असल्याचे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटीले यांनी सांगितले. घोषणांनी परिसर गेला दणाणले मनोज जरांगे पाटील यांनी रविवार (दि. 19) देहू येथे भेट देत संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले. या वेळी देहूगाव सकल मराठा समाजाच्या वतीने सहा जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करून पन्नास ते साठ फुटी फुलांचा हार क्रेनच्या साह्याने घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी देहूनगरी दणाणून गेली होती.

संबंधित बातम्या :

या वेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना दोन अंग आहेत. एक क्षत्रिय की ज्यांच्यात लढण्याचा बळ आहे आणि दुसरं अंग म्हणजे हा समाज शेती करणारा आहे. या देशाला धान्यही पुरवतो म्हणून तो कुणबी आहे. यासाठी सरकारने आरक्षण हे दिलेच पाहिजे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी साकडं घेतलं आहे की, या सरकरला सद्बुध्दी द्या आणि मराठा समाजाला 1 डिसेंबरच्या आत आरक्षण मिळावे.

ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी धोका दिला
माझ्या मराठा समाजाच्या वडीलधार्‍या मंडळींनी एक स्वप्न पाहिले होते की, माझे लेकरू अधिकारी बनेल आणि माझ्या कष्टाचे फळ मला मिळेल. माझ्या वाट्याला आलेले कष्ट कमी होईल. मराठा आरक्षणाबाबत ज्या ज्या कमिट्या, आयोग निर्माण झाले, जे राज्यकर्ते झाले त्यांच्यावर या मराठा समाजाने विश्वास ठेवला. परंतु, शेवटी त्यांनी सांगितलं की मराठ्यांचे पुरावे सापडत नाहीत. कारण जे जे राज्यकर्ते बनले त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव होता आणि मराठ्याचा मुलगा मोठा नाही झाला पाहिजे, असे त्यांनी षड्यंत्र रचले होते. याचे मुख्य कारण मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता.

कुठल्याही परिस्थितीत आरक्षण हे मिळवणारच
त्यांना माहीत नव्हतं की, आपल्या पाठीमाघून आपल्यावर वार होतोय. थोडासा त्रास होईल तुम्हाला; पण होऊ द्या. कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण हे मिळवणारच. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जरांगे पाटील मुख्य मंदिरात गेले. त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि शिळा मंदिरात जाऊन संत तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

देहूरोड परिसरातही स्वागत
देहूरोड परिसरातील किवळे, रावेत, विकासनगर, मामुर्डी, साईनगर, गहुंजे या भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने देहूरोड येथील सेंट्रल चौकात फटाक्यांची आतषबाजी करून तसेच क्रेनच्या साह्याने पुष्पवृष्टी करून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

Back to top button