

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील सह-दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सध्या सदनिका करारनाम्यांच्या दस्त नोंदणीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकूण दस्तांच्या तुलनेत जवळपास 80 टक्के दस्त हे सदनिका करारनाम्यांचे नोंदविले जात आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा विक्री झालेले तसेच, पुनर्विक्री झालेल्या सदनिकांच्या करारनाम्याचा समावेश आहे. शहरामध्ये 7 सह-दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत आहेत. कार्यालयांमध्ये सातत्याने जाणवणार्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे येथे दस्त नोंदणीसाठी येणारे नागरिक, वकील हे त्रस्त होतात. मात्र, सध्या सर्व्हर डाऊनची समस्या कमी झाल्याने दस्त नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे.
पिंपरीतील हवेली क्रमांक 26 च्या कार्यालयात सध्या दिवसाला 25 ते 35 दस्तांची नोंदणी केली जात आहे. त्यामध्ये सदनिका करारनाम्यांचे प्रमाण हे 70 ते 80 टक्के इतके आहे. जुलै महिन्यात हवेली क्रमांक 26 च्या कार्यालयात एकूण 723 दस्तांची नोंदणी झाली. त्यामध्ये भाडे करारनाम्यांची ऑनलाइन नोंदणी तसेच, सदनिका करारनामे, कुलमुखत्यारपत्र, हक्कसोड, गहाणखत, विकसन करारनामा, खुल्या जमिनीचे खरेदीखत, बक्षीसपत्र आदींचा समावेश आहे. कार्यालयाला मुद्रांक आणि नोंदणी शुल्कातून जुलै महिन्यात एकूण 31 कोटी 87 लाख 38 हजार 973 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा समावेश आहे, अशी माहिती प्रभारी सह-दुय्यम निबंधक योगेश मुंडे यांनी दिली.
पिंपरीतील हवेली क्रमांक 18 च्या कार्यालयात सध्या दररोज 40 ते 45 दस्तांची नोंदणी होत आहे. या कार्यालयात एकूण दस्तांच्या तुलनेत नोंदविण्यात येणार्या सदनिका करारनाम्यांचे प्रमाण हे 90 टक्के इतके आहे. कार्यालयाला दस्त नोंदणीतून एकूण 34 कोटी 57 लाख 85 हजार 725 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा समावेश आहे, अशी माहिती कार्यालयातून देण्यात आली.
हेही वाचा