Pimpri News : डिजिटल शिक्षणावर भर, मात्र खेळाडू घडविण्याकडे दुर्लक्ष

Pimpri News : डिजिटल शिक्षणावर भर, मात्र खेळाडू घडविण्याकडे दुर्लक्ष

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड महापलिकेचा सर्व शाळा स्मार्ट करण्याकडे कल आहे. त्यासाठी डिजिटल शिक्षण घेत आहेत; मात्र अभ्यासाव्यतिरिक्त काही विद्यार्थी हे क्रीडा निपुणदेखील आहेत. हा क्रीडा विकास प्राथमिक शिक्षण घेत असतानाच होत असतो. त्यासाठी क्रीडा शिक्षकांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे; मात्र पालिकेच्या 105 शाळांमध्ये फक्त आठच क्रीडा शिक्षक आहेत.

तसेच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पुरेसे क्रीडा साहित्यदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे शाळांमध्ये खेळाडू कसे तयार होणार, हा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना शारीरिक आणि बौद्धिक विकास हा शाळेतच घडत असतो. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक असते; मात्र पिंपरी- चिंचवड महापलिकेच्या 22 शाळांना मैदान नाही; तसेच 17 शाळांची मैदाने छोटी असल्याने विद्यार्थ्यांनी खेळायचे कसे असा प्रश्न पडत आहे.

क्रीडा साहित्य नसल्याने आवड कमी

शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यातील दोन ते चार तास खेळाचे असतात. यामध्येच विद्यार्थ्यांतील क्रीडागुणांचा विकास होत असतो. विद्यार्थी कोणत्या खेळात निपुण आहे, हे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील अवस्थेतच कळण्यात मदत होते. पण याच खेळण्या- बागडण्याच्या वयात क्रीडा शिक्षक आणि क्रीडा साहित्य नसल्याने विद्यार्थ्यांची खेळाविषयीची गरज आणि आवड कमी होत आहे.
मैदानात नाही डबलबार व खो-खो चे खांब प्रत्येक शाळेच्या मैदानात विशिष्ट ठिकाणी खो-खो चे खांब आणि डबलबार असतात. विद्यार्थी शाळेच्या सुटीमध्येदेखील याठिकाणी खेळतात. मात्र, मनपाच्या शाळांमध्ये खो-खो चे खांब आणि डबलबार दिसत नाही. तसेच क्रीडा साहित्यदेखील नसल्याने त्यामुळे मधल्या सुटीत लपंडाव, पाठशिवणी असे क्रीडा प्रकार खेळताना दिसतात.

शाळांनी मैदानावर खो-खो, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, यासह आदी मैदानी खेळासाठी सुविधा उपलब्ध करून द्यायची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेत असतानाच चांगली क्रीडा मैदाने असतील तर त्यांचा सरावही उत्तम होईल. महापालिकेनेदेखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी शाळांना मैदाने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मनपा विद्यार्थ्यांची खेळासाठी कुचंबणा होत आहे.

फक्त 8 क्रीडाशिक्षक उपलब्ध; 15 शिक्षकांना इलेक्शन ड्युटी

महापालिका शाळेत असलेल्या क्रीडाशिक्षकांना इतर कामे लावली जातात; तसेच क्रीडाशिक्षक कमी असताना निवृत्तीनंतर पद भरत नसल्याने रिक्त क्रीडाशिक्षक निवृत्त झाल्यावर पद भरले जात नाही. मुळात कला आणि क्रीडा हे सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. शिक्षकांची पद भरली जात नसल्याने क्रीडा विकासाला खीळ बसली आहे.

आमच्याकडील पंधरा क्रीडाशिक्षक 2010 पासून इलेक्शन ड्युटीवर आहेत. दोन महिन्यांपूर्वी आम्ही त्यांची मागणी केली आहे. मात्र, निवडणूक विभागाने त्यांना अजून त्या कामातून मुक्त केलेले नाही. या शिक्षकांऐवजी पर्यायी शिक्षक मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. ते लवकर मिळतील अशी अपेक्षा आहे आणि मागेल त्या शाळांना 49 प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देऊ शकतो.

-मिनीनाथ दंडवते, क्रीडा उपायुक्त.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news