खोर : पुढारी वृत्तसेवा : राज्याचा निधी तर येतच होता. मात्र, महत्त्वपूर्ण प्रश्न आजही प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्राच्या निधीची गरज आहे. हा निधी आणून विकासकामे मार्गी लावण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वरवंड (ता. दौंड) येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार बोलत होते. या वेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर शरसंधान साधले. सुप्रिया काल सभेत म्हणाल्या की, पुण्याचे पाणी ग्रामीण भागाला देताना कोणता मायेचा लाल अडवितो तेच मी पाहते. त्या वेळी याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, अगं बाई, आधी त्या धरणात पाणी तर आहे का ते पाहा, मग बोल.
रोहित पवार यांंच्या आरोपाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी विकासकामे करणारा माणूस आहे. मी कारखाने बंद पडणारा माणूस नाही. मी शब्दाचा पक्का आहे. सर्व बंद पडलेले कारखाने माझ्या नावावर टाकून तुमची पोळी भाजून घेऊ नका. विकासकामासाठी आ. राहुल कुल, माजी आ. रमेश थोरात, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, दत्ता भरणे हे आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहे. आचारसंहिता संपल्यानंतर दूध दरवाढ, शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न व पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन पवार
यांनी दिले.
अजित पवार म्हणाले, खडकवासला धरण, टाटाचे पाणी वळवून मुळशी धरणाच्या माध्यमातून हे पाणी ग्रामीण भागाला देऊन उन्हाळ्याच्या कालावधीमधील शेतकर्यांची फरफट मला थांबवायची आहे. आज सोन्याचा चमचा तोंडात घेऊन काही माणसे जन्माला आली आहेत. त्यांना शेतातील व शेतकर्यांचे हित माहीत नाही. बारामती तालुक्यानंतर दोन नंबर दौंड तालुका करायचा असून, त्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. भावकीचे राजकारण करण्याचे नाही. भावनिक होऊ नका, असाही सल्ला अजित पवार यांनी दौंडकरांना दिला.
आ.राहुल कुल म्हणाले, सर्वांनी मतभेद विसरून एकत्रित येऊन महायुतीच्या पाठीमागे राहून आपला उमेदवार विजय करायचा आहे. खडकवासला पाणीप्रश्न, जनाई योजना हे सर्व निर्णय विधानसभा निवडणुकीआधी मार्गी लागली जातील. 380 कोटी रुपये योजनेची जनाई योजना प्रस्तावित आहे. मुळशी धरणाचे पाणी हा विषयदेखील अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व निर्णय लवकरात लवकर मार्गी लागले जातील.
या वेळी माजी आमदार रमेश थोरात, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचे भाषण झाले. प्रदीप गारटकर, कांचन कुल, नंदू पवार, वैशाली नागवडे, विरधवल जगदाळे, उत्तम आटोळे, तानाजी दिवेकर, नागसेन धेंडे, राणी शेळके, तुषार थोरात, गोरख दिवेकर, राहुल दिवेकर, प्रदीप दिवेकर, मधुकर दोरगे, सागर फडके तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सागर फडके यांनी आभार मानले.
हेही वाचा