पुणे : पीएमपीएल बसने नेले फरफटत; वृध्देचा मृत्यू
येरवडा : पुढारी वृत्तसेवा
विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात दुपारी पीएमपीएल बसच्या मागील चाकाखाली आल्याने जेष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिला बसखाली आल्याचे चालकाला कळलेच नाही, त्यामुळे ही महिला काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पद्मा पंढरीनाथ गायकवाड (वय ७५, रा. गोल्डक्राफ्ट हाऊसिंग सोसायटी, चव्हाण चाळ, विश्रांतवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पदमा गायकवाड या दुपारी पावणेचार च्या सुमारास रस्ता ओलाडत असताना, विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्याने त्या काही अंतर फरफटत गेल्या. या अपघातात त्यांचे शरीर छिन्नवीच्छीन्न झाले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. विश्रांतवाडी पोलिसांनी बस चालक, वाहक यांना बससह ताब्यात घेतले आहे. मृत गायकवाड यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

