बिबवेवाडी: ‘माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करताना येणार्या त्रुटी आणि अडथळे दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,’ असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबा आढाव यांना दिले.
ज्येष्ठ कामगारनेते डॉ. बाबा आढाव यांच्या घरी जाऊन रामदास आठवले यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी डॉ. आढाव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच माथडी कामगार कायद्यासह विविध विषयांवर चर्चा केली. (Latest Pune News)
मुंबईतील गिरणी कामगार जसा हद्दपार झाला आहे, तसा अलीकडच्या काळात माथाडी कायद्यातील बदलांमुळे हमाल कष्टकरी बांधव हद्दपार होण्याची भीती आहे. ड्रेनेजमधील विषारी वायूमुळे साफसफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच स्मशानभूमीत काम करणार्या कामगारांची अवस्थाही बिकट झाली आहे. असंघटित कामगारांना सध्या कोणीही वाली उरला नाही. यामुळे सामाजिक न्यायमंत्री या नात्याने आपण कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या वेळी डॉ. आढाव यांनी आठवले यांच्याकडे केली.
आठवले म्हणाले की, रेल्वे मालधक्का कामगार आणि माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकार्यांची बैठक येत्या 29 मे रोजी मुंबईत आयोजित केली आहे. असंघटित आणि माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, आरपीआय नेते परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.