खडकवासला: पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि मुठा खोर्याला सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. धरणक्षेत्रात दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत मुसळधार पाऊस पडला.
टेमघर येथे तीन तासांत सर्वाधिक 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने धरणसाठ्यात वाढ झाली नसली, तरी पाण्याचे बाष्पीभवन थांबणार आहे. ओढे-नाल्यांतून धरणसाठ्यात किंचित भर पडत आहे. त्यामुळे ऐन टंचाईच्या काळात पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. (Latest Pune News)
गेल्या आठवड्यापासून एक-दोन दिवसाचे अपवाद वगळता खडकवासला धरण साखळीखालील भागात दररोज पाऊस पडत असला, तरी धरणक्षेत्रात उघडीप होती. सोमवारी सकाळी कडकडीत ऊन पडले होते. दुपारपासून आभाळ ढगांनी भरून आले. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. पानशेत येथे 13 व वरसगाव येथे 14 मिलिमीटर पाऊस पडला, तर खडकवासला येथे पावसाची नोंद झाली नाही.
खडकवासला, सिंहगड भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा वाढला आहे. खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता 6.34 टीएमसी म्हणजे 21.74 टक्के साठा शिल्लक होता. सध्या वरसगाव व पानशेत धरणातून प्रत्येकी 600 क्यूसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. जवळपास गतवर्षीच्या साठ्याइतकेच पाणी सध्या शिल्लक आहे.गेल्या वर्षी 19 मे 2024 रोजी धरण साखळीत 6.46 टीएमसी म्हणजे 22.18 टक्के इतका पाणीसाठा होता.
मान्सूनपूर्व पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाली नाही. पानशेत व वरसगावमधून पाणी सोडले जात असल्यामुळे साठ्यात घट सुरू आहे. मात्र पाण्याचे बाष्पीभवन थांबणार असल्याने त्याचा लाभ पुणेकरांना मिळणार आहे.
- अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण विभाग