Pune News : ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न करावा : गिरीश महाजन

Girish Mahajan In Nagpur
Girish Mahajan In Nagpur
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत असून, अधिकार्‍यांनी संवेदनशीलतेने आणि पूर्ण क्षमतेने या योजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (आस्थापना/ विकास), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला 'यशदा'चे महासंचालक एस.चोक्कलिंगम, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सचिव के. टी. पाटील, एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, पंचायत राज संचालक आनंद भंडारी, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. राजाराम दिघे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, विविध जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

महाजन म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असताना अजूनही ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्याचे प्रश्न पूर्णतः सुटलेले नाहीत. ते सोडविण्यासाठी अधिकार्‍यांनी संवेदनशीलतेने आणि कल्पकतेने काम करावे. गाव स्वच्छ आणि सुंदर होईल यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा. गावातील शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी अधिकार्‍यांनी नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी 'उमेद'सारखी महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे. विविध योजनांचा माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे, त्याला त्याच्या हक्कच्या मूलभूत सुविधा आणि त्याचे जीवनमान उंचावण्याचे कार्य ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा मंत्री महाजन यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news