विजेच्या लपंडावाने अर्थकारण विस्कळीत; उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात

विजेच्या लपंडावाने अर्थकारण विस्कळीत; उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात

[author title="दीपेश सुराणा" image="http://"][/author]

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महावितरणकडून पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक पट्ट्यात करण्यात येणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने लघुउद्योगांचे अर्थचक्र विस्कळीत होत आहे. त्याचप्रमाणे, त्याचा परिणाम त्यांच्या अर्थकारणावरदेखील होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणसमवेत उद्योजकांच्या वारंवार बैठका झाल्या. अधिकार्‍यांकडून अडचणी सोडविण्याचे आश्वासन मिळाले. मात्र, प्रश्न सुटत नसल्याने लघुउद्योगांसमोरील अडचणींचा चक्रव्यूह कायम आहे.

पिंपरी, चिंचवड, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी इन्फोटेक पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण औद्योगिक वसाहत अशा मोठ्या पट्ट्यात सध्या औद्योगिक विस्तार झाला आहे. शहरातील भोसरी, पिंपरी, चिंचवड एमआयडीसीचा परिसर त्याचप्रमाणे, तळवडे, गुळवे वस्ती, चिखली, कुदळवाडी, मोशी, आनंदनगर, शांतीनगर, सेक्टर 7 आणि 10 आदी पट्ट्यात वारंवार खंडित वीज पुरवठ्याची समस्या जाणवत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यातच ही परिस्थिती आहे. पावसाळा सररू झाल्यानंतर काय होईल, या कल्पनेनेच उद्योजक हवालदिल झाले आहेत.

उत्पादन निर्मितीला अडथळा

एखाद्या परिसरामध्ये दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा थेट परिणाम लघुउद्योगांवर होतो. एका लघुउद्योगामध्ये कमीत कमी 10 कामगार काम करतात, असे गृहित धरले तरी ज्या दिवशी वीजपुरवठा खंडित होतो, त्या दिवशी उत्पादन निर्मितीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दिवसाला कमीतकमी 5 हजार रुपयांचे नुकसान होते. हे नुकसान भरुन काढण्यासाठी कामगारांना ओव्हरटाईम देऊन कामावर बोलवावे लागते. त्याचा खर्च प्रतिदिन 10 हजार रुपयांपर्यंत जातो.

असे एका दिवसामागे एकूण 15 हजार रुपयांचे नुकसान होते. म्हणजे महिन्यात जर दहा वेळा वीजपुरवठा खंडित झाला तरी किमान दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान होते, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली. एकंदरितच वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा लघुउद्योगांच्या अर्थकारणावर परिणाम होत आहे.

मोठे उद्योग शोधतात दुसरा पर्याय

मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना उत्पादन निर्मितीसाठी लागणारे विविध सुटे भाग तयार करण्याचे काम दिले जाते. एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तेथील लघुउद्योजकांना मोठ्या उद्योगांनी सोपविलेले काम वेळेत पूर्ण करता येत नाही. पर्यायाने, अशा परिस्थितीत मोठ्या उद्योगांकडून अन्य पर्याय शोधले जातात.

हे काम दुसर्‍या लघुउद्योगांमार्फत पूर्ण करुन घेतले जाते. वीजपुरवठा खंडित झाला असताना जनरेटरचा वापर करुन काम सुरू करण्याचे लघुउद्योजकांनी ठरविले तर जनरेटरचे भाडे आणि डिझेल यांचा खर्च एका दिवसात मिळणार्‍या उत्पन्नाच्या तुलनेत जास्त होतो. पर्यायाने हा खर्च परवडत नाही, असे काही लघुउद्योजकांनी सांगितले.

शहरातील एमआयडीसी परिसरात खंडित वीज पुरवठ्याची समस्या वारंवार जाणवते आहे. याबाबत आता ऊर्जामंत्र्यांनीच बैठक घेऊन तोडगा काढावा. तसेच, एमआयडीसी परिसरातील सर्व वीजवहन यंत्रणा बदलावी. हा प्रश्न न सुटल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल. महावितरणकडून पावसाळापूर्व कामे अद्याप पूर्ण झालेली नाही.

– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

चिंचवड एमआयडीसीतील डी 3 ब्लॉकमध्ये बुधवारी (दि. 29) जवळपास दोन तास खंडित वीजपुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. बर्‍याच ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम केल्याने वारंवार केबल तुटण्याचे प्रकार घडत आहेत. चाकण एमआयडीसी परिसरामध्ये महावितरणकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. महावितरणने एप्रिलपासून वीजदर वाढविले आहेत, त्यानुसार उत्तम दर्जाची सेवा देणे तसेच, वीजपुरवठ्यासाठी चांगल्या दर्जाचे साहित्य वापरणे गरजेचे आहे.

– अतुल इनामदार, उद्योजक

डी-3 ब्लॉकमध्ये बुधवारी (दि. 29) पाच-पाच मिनिटांसाठीच दोनदा वीजपुरवठा खंडित झाला होता. वैयक्तिक कारणामुळे एखाद्या उद्योगातील वीजपुरवठा जास्त वेळ खंडित झाला असू शकतो. वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन सबस्टेशन, नवीन फीडर आदी कामे प्रस्तावित आहेत. पावसाळ्यात खंडित वीजपुरवठ्याची समस्या जाणवू नये, यासाठी पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यावर सध्या भर दिला जात आहे.

– अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, महावितरण

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news