

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यातील निरा-देवघर धरणपट्ट्यात शेतकर्यांनी धूळवाफेवरील भात बियाणांची पेरणी सुरू केली आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने निरा-देवघर धरणाच्या बॅक वॉटरवर असणार्या वरवंड, हिरडोशी, कोंढरी, देवघर, वेनपुरी, कारुंगण, शिरगाव, आशिंपी, शिरवली, दुर्गाडी, रायरी, आपटी, निगुडघर आदी गावांत चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे येथील शेत जमिनींमध्ये चांगला वाफसा झाला आहे.
अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नसतानाही येथील शेतकर्यांनी धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात केली आहे. इंद्रायणी, राशी पूनम, रत्नागिरी 24, दप्तरी या भात वाणांच्या बियाणांना अधिक पसंती देत शेतकर्यांकडून पेरणी केली जात आहे. तर खरीप हंगामातील इतर पिकांच्या पेरणीचीही पूर्वतयारी सुरू केली आहे.
या भागातील शेतकरी मे महिन्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी करून मान्सून पावसाची वाट पाहत असतात. 7 जूनला मान्सूनचे आगमन होईल किंवा नाही याची वाट न पाहता धूळवाफेवरच भाताची पेरणी करतात. वेळेत भाताची पेरणी झाल्यावर उत्पादनाचा फायदा होतो, असे येथील शेतकरी सांगत आहेत.
या भागात मान्सून पावसाचे आगमन झाल्यावर धूळवाफेवरील पेरणीची चांगल्या पद्धतीने उगवण होते. भात रोपे वेळेत लागवडीस येतात. वेळेत लागण झाली की उत्पन्नात वाढ होते.
– हनुमंत धामुनसे, हिरडोशी.
हेही वाचा