नसरापूर : गुंजवणीच्या कामाला कोळवडी ग्रामस्थांचा विरोध | पुढारी

नसरापूर : गुंजवणीच्या कामाला कोळवडी ग्रामस्थांचा विरोध

नसरापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गुंजवणी प्रकल्पाचे पाइप टाकण्यासाठी शेतजमिनी उकरल्या जात आहेत. शासनाने दिलेल्या नियमानुसार एल अ‍ॅण्ड टी ठेकेदारकडून कामे होत नाही. ढोबळ कारभारामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे असा
आरोप करत जोपर्यंत न्याय्य हक्क मिळत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही, असा पवित्रा घेत कोळवडी (ता. भोर) ग्रामस्थांनी काम बंद पाडले. गुंजवणीतून पुरंदर तालुक्यात पाणी नेण्यासाठी पाइप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या कामामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप मसुरकर- कोळवडी ग्रामस्थांनी केला आहे. शासन दरबारी न्याय मागूनदेखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. उलट, आमच्यावरच दबाव टाकला जात आहे, असे गणेश मसुरकर, सीताराम फदाले, काशिनाथ मसुरकर, सोपान मसुरकर, शेखर मसुरकर, स्वप्नील चव्हाण, संतोष मसुरकर, महादेव पडवळ, राहुल मसुरकर, अजित शिंदे, धनंजय पोमण, पांडुरंग मसुरकर आदींनी सांगितले.

याबाबत एल अ‍ॅण्ड टीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. उकरलेल्या गौणखनिजाची विल्हेवाट न लावल्याने दगड, धोंडे तसेच पडून आहेत. शेतातील पाण्याचे प्रवाह गायब झाले आहेत. पाणंद रस्त्यांचे नुकसान झाले आहे. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उकरण्यात आला आहे. अशा विविध बाबींमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कामाला विरोध केला की तातडीने पोलिस हजर होतात. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा आहे. पाइप टाकण्याचे काम करताना घरांना तडे गेले आहेत. यामुळे काम बंद करण्याचा ठराव करूनदेखील काम सुरू असल्याचे सरपंच लता मसुरकर यांनी सांगितले.

हेही वाचा

पुणे-सोलापूर महामार्ग बनतोय कचरा डेपो

पैठणची शाळा घडवतेय टाळकरी अन् कीर्तनकार !

नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

Back to top button