सावधान ! रस्त्यावर तळलेले वडापाव, भजीतून आजारांचे इनकमिंग!

सावधान ! रस्त्यावर तळलेले वडापाव, भजीतून आजारांचे इनकमिंग!
Published on
Updated on
पुणे :  रिमझिम बरसणारा पाऊस… गरमागरम चटकदार वडापाव आणि भजीचा आस्वाद म्हणजे दुग्धशर्करा योगच! मात्र, बहुतांश गाड्यांवरील अस्वच्छता, तळण्यासाठी वारंवार वापरले जाणारे खाद्यतेल आणि घटक पदार्थांची साशंक गुणवत्ता यामुळे पावसाळ्यात पोटदुखी, अपचन, अ‍ॅसिडिटी, विषबाधा, जुलाब, उलट्या अशा आजारांचे इनकमिंग वाढत आहे. बाहेरचे पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पावसाळ्यात वडापाव आणि भजीच्या गाड्यांवर ताव मारणार्‍या खवय्यांची संख्या वाढलेली दिसते. पावसात चिंब भिजल्यावर गरमागरम पदार्थ आनंद द्विगुणित करतात. पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये खाऊगल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 'स्ट्रीट फूड'ला आगळे ग्लॅमर प्राप्त झाले आहे. कधीतरी मजा म्हणून हे पदार्थ खायला हरकत नाही; मात्र, वारंवार हे पदार्थ खाल्ल्याने आपण नकळतपणे आजारांना आमंत्रण देत असतो, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.
एफडीए काय करते?
अन्न व औषध प्रशासनातर्फे वर्षभर पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात तपासणी मोहीम राबवली जाते. पावसाळ्यात मोहिमेवर विशेष भर दिला जातो. एफडीएतर्फे एप्रिल ते जुलै या कालावधीत जिल्ह्यात 451 तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 145 जणांना सुधारणा करण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली. 4 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 8 जणांकडून 1 लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एफडीएच्या पथकाकडून 250 नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी 14 नमुने अप्रमाणित असल्याचे निदर्शनास आले. तर, 7 नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले.
रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापावच्या गाड्यांवर मोठी तेलाची कढई ठेवलेली असते. त्यामध्ये दिवसभर भजी, वडे तळले जातात. वारंवार तेल तापत असल्याने त्याचे रासायनिक स्वरूप बदलू लागते. त्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात. अशा तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने घशात खवखवणे, खोकला, अ‍ॅसिडिटी असा त्रास सुरू होतो. याशिवाय, शरीरावर दीर्घकालीन परिणामही होतात. एलडीएल नावाचे वाईट कोलेस्टेरॉल वाढून हृदयाला धोका निर्माण होऊ शकते. शरीराचा दाह होणे, स्थूलता, मधुमेह, संधिवात असे आजारही होऊ शकतात. त्यामुळे घरात केलेले पदार्थच खावेत.
                                                                                                  – अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ
सुवर्णमध्य काय?
 गाडीवरील लोकांना वडापाव, भजी तळण्यासाठी लागणारे तेल फेकून देणे परवडण्यासारखे नसते. अशा वेळी गाड्यावरील लोकांनी एका वेळी जेवढे लागेल तेवढेच तेल वापरायला काढल्यास त्यांचे नुकसान होणार नाही आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हिताचे ठरू शकेल.
हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news