पुणे : जलजीवन मिशनची सव्वाशे गावांतील कामे पूर्ण | पुढारी

पुणे : जलजीवन मिशनची सव्वाशे गावांतील कामे पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी  आतापर्यंत वर्षभरात  132 गावांमध्ये कामे पूर्ण झाली आहेत. या गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी दिली
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 1 हजार 230 महसुली गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी 1 हजार 957 कोटी 89 लाख रुपयांच्या निधीची तरतूद आहे. जिल्ह्यातील इंदापूर आणि दौंड तालुका वगळता इतर तालुक्यांतील गावांचा पूर्ण झालेल्या कामांमध्ये समावेश आहे. भोर तालुक्यातील सर्वाधिक 25 गावांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात 72 टक्के नळजोडणी पूर्ण झाली असून, 8 लाख 93 हजार 862 पैकी 31 मार्चपर्यंत 6 लाख 39 हजार 932 घरांमध्ये नळजोडणी करण्यात आली आहे. तर, 1 एप्रिलपर्यंत 21 हजार 857 जणांनी नळजोडणीसाठी नोंदणी केली आहे. दोन लाख 32 हजार 73 घरे अजूनही नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
उर्वरित कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध होणार असून, ती कामेही लवकरच मार्गी लागतील, असेही खताळ यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांची नुकतीच बैठक झाली. त्यात कामांच्या दर्जाकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या असल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.
पूर्ण झालेल्या गावांची तालुकानिहाय आकडेवारी
भोर – 25, मावळ – 21, मुळशी – 17, आंबेगाव – 4, बारामती – 8, हवेली – 8, जुन्नर – 4, खेड-1, पुरंदर – 7, शिरुर-7, वेल्हा -30.
हेही वाचा  :

Back to top button