

पुणे: दुबईवर रात्रभर मिसाईलचे (क्षेपणास्त्र व ड्रोन) हल्ले सुरू होते. त्यांना रोखण्यासाठीची यंत्रणा सक्षम असल्याने हवेतल्या हवेतच ते नष्ट केले जात होते. त्यामुळे काही मिनिटांच्या अंतराने होणारे स्फोटाचे आवाज... त्यामुळे थरथरणाऱ्या खिडक्यांच्या काचा... अशा परिस्थितीत आम्ही संपूर्ण रात्र जागून काढली.
सकाळनंतर मात्र परिस्थिती निवळली. स्फोटांचे आवाज कमी झाले. जनजीवन सुरळीत सुरू झाले असले, तरी कुठेतरी भीतीचे सावट कायम आहे, अशी प्रतिक्रिया दुबईस्थित पुणेकर रुद्धी मंत्री-बक्षी यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.
रुद्धी ह्या गेल्या काही वर्षांपासून दुबईतील बुर्ज खलिफाजवळील बिझनेस बे येथे वास्तव्यास आहेत. त्या ला कॅपिटल या कंपनीत नोकरी करतात. त्यांचे पती अस्पोरा या वित्तसंस्थेत एका विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात. त्या म्हणाल्या की, दुबई प्रशासन सर्व रहिवाशांची अतिशय योग्यरीतीने काळजी घेत आहे. दुबईतील दोन्ही विमानतळांवर हल्ले झाल्याची चर्चा असून, हे विमानतळ वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
अनेक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, शाळाही ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. विमानतळांवर तसेच हॉटेल्समध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी येथील अनेक नागरिक पुढे आले असून, त्यांनी आपली घरे अशा आपदग््रास्तांसाठी खुली केल्याच्या रील्स प्रसारित केल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
टीव्ही पाहणे बंद केले
या परिस्थितीत नागरिकांनी घाबरू नये, अकारण जास्तीचे सामान भरून घबराटीचे वातावरण पसरवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवेत नष्ट करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचे भाग पडून काही इमारतींचे नुकसान झाले आहे. बुर्ज अल अरब या इमारतीचेही नुकसान झालेले आहे. टीव्हीवर सतत यासंबंधीच्या बातम्या दाखवत असल्यामुळे आम्ही घाबरून टीव्ही पाहणे बंद केले आहे, असे रुद्धी मंत्री म्हणाल्या.