

पुणे: केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांमध्ये केलेल्या अलीकडील बदलांमुळे औषधे, वैद्यकीय सेवा तसेच रुग्णवाहिका वापराचा खर्च कमी होणार आहे. यापूर्वी औषधांवर लागणारा कर 12 टक्के होता. नव्या दरकपातीमुळे तो 5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. परिणामी, सर्वसामान्यांना लागणारी ताप-खोकला, रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार नियंत्रणासाठीची औषधे आता 7 ते 10 टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत.
वैद्यकीय सेवांच्या बाबतीत खासगी रुग्णालयात होणार्या काही महत्त्वाच्या शस्त्रक्रिया व उपचारांवर आकारला जाणारा कर कमी केला आहे. या सेवांवरील 18 टक्के जीएसटी आता 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे विविध तपासण्या, निदान चाचण्या तसेच मध्यम स्वरूपाच्या उपचारांच्या शुल्कात अंदाजे 5 ते 8 टक्क्यांची कपात अपेक्षित आहे. (Latest Pune News)
गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना याचा थेट फायदा होईल.तसेच, रुग्णवाहिका सेवेवर लावला जाणारा जीएसटीही घटवण्यात आला आहे. यापूर्वी 12 टक्के दराने कर आकारला जात होता. आता हा कर 5 टक्क्यांवर आणल्यामुळे रुग्णवाहिका वापराचा खर्च साधारण 7 ते 10 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
जीएसटी कमी केल्याचा रेल्वेवर परिणाम नाही
केंद्र शासनाने जीएसटीचे दोन टप्पे कमी केले, त्यामुळे बहुतांश वस्तुंचे दर कमी होण्याची शक्यता आहेत. याबाबत पुणे रेल्वे विभागाशी संवाद साधला. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहेरा म्हणाले, आमच्याकडील तिकीट दरासह सर्व सेवांवर फक्त 5 टक्केच जीएसटी लावण्यात येतो. दोन स्लॅब कमी केले तरी रेल्वेच्या कोणत्याही सेवेवर जीएसटीचे टप्पे कमी केल्याचा कोणताही परिणाम होणार नाही
औषधांचे दर कमी व्हावेत, यासाठी केमिस्ट असोसिएशनने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जीएसटी काऊन्सिलला पत्र दिले होते. जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणल्यामुळे सामान्य नागरिकांना फायदा होईल. जीएसटी कमी करण्याच्या या निर्णयाचे आम्ही संघटनेतर्फे स्वागत करतो.
- अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन, पुणे जिल्हा