Drugs Case : नशेच्या बाजारात गांजाचाच अंमल!

Drugs Case : नशेच्या बाजारात गांजाचाच अंमल!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभमधील अर्थकेम लॅबोटरीज या कंपनीवर छापा टाकून पुणे पोलिसांनी आंतराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले. मात्र, शहरात तरुणाई नशेसाठी सर्वाधिक गांजाचा वापर करत असल्याचे वास्तव आहे. डिसेंबर 2023 अखेर पोलिसांनी तब्बल 64 गुन्हे दाखल करून एक हजार 145 किलो गांजा जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी मागील आठ दिवसांत विश्रांतवाडी, कुरकुंभ, दिल्लीपर्यंत कारवाई करत मेफेड्रॉनचा मोठा साठा जप्त केला. मात्र, त्याच्या विक्रीची पुणे ही बाजारपेठ नव्हती. विदेशासह देशातील इतर भागांत पाठविण्यासाठी मेफेड्रॉनची निर्मिती केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोकेन, ब्राऊन शुगर, मेफेड्रॉन, हेरॉईन हे महागडे अमली पदार्थ आहेत.

त्यामुळे ते नशा करणाऱ्या अनेकांच्या खिशाला परवडत नाहीत. अशा ड्रगची नशा करणारा ठरावीक वर्ग आहे. तुलनेत गांजाचे मात्र वेगळे आहे. सहज, कमी किमतीत गांजा उपलब्ध होतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पार्टी ड्रग म्हणून गांजाचा वापर केला जातो. गांजा, कोकेन, चरस, मेफेड्रॉन (एमडी), मशरूम, कॅथा इडुलीस खत, दोडा पावडर, एम.डी.एम.ए. अफिम, ब्राऊन शुगर, एलएसडी पेपर, हॅश ऑईल, ओझीकुश गांजा, बंटा, टॅब निट्राझिपॅम, टॅब, हेरॉईन, मॅस्केलाईन या तब्बल सतरा अमली पदार्थांची नशा शहरात केली जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले असून, पोलिसांनी ते अमली पदार्थ जप्त केले आहेत.

(अमली पदार्थांचा व्यवसाय म्हणजे कमीत- कमी मेहनतीत जास्तीत- जास्त पैसा. शहरातील अमली पदार्थाचा व्यवसाय गुंतागुंतीचा आहे. झोपडपट्टी, लेबर कॅम्पपासून ते आलिशान वस्त्यांपर्यंत ही काळी दुनिया पसरलेली आहे. फक्त जो तो त्याच्या ऐपतीनुसार अमली पदार्थांची नशा करतो. 80 ते 90 च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती. मात्र, काळ बदलला, तसा हा व्यवसायदेखील तेवढ्याच गतीने बदलला. आता कोकेन, ब्राऊन शुगरला मागे टाकून अमली पदार्थांनी त्याची जागा घेतली आहे. गुन्हेगारांनी थेट औद्योगिक वसाहतीत ड्रग तयार करण्याचे कारखाने थाटले आहेत. पुण्याभोवती अमली पदार्थ तस्करांचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रॉन, एलएसडी स्टॅम्प, अफू, ब्राऊन शुगर यांचा समावेश होता. कारवाईदरम्यान अटक केलेले केवळ प्यादे असतात. त्यांचे मास्टरमाइंड नव्या साखळीद्वारे नशाखोरीची मंडी लावतात. ससून ड्रग प्रकरणात थेट ड्रगचे उत्पादन करणाऱ्या आरोपींनाच पोलिसांनी पकडले आहे. त्यानंतर कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत पोलिसांनी कारवाई करून मेफेड्रॉनचे उत्पादन करणाऱ्या ठिकाणावर घाव घातला.

तर तेथून तयार करून पाठविण्यात आलेला मालदेखील जप्त केला. आत्तापर्यंत शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यामध्ये प्रामुख्याने नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर असल्याचे दिसून येते होते. मात्र, गेल्या काही कारवाया पाहता, त्याचे धागेदोरे पुण्यापासून थेट दिल्ली ते लंडनपर्यंत असल्याचे समोर आले. नायजेरियन तस्कर पूर्वी गोवा, मुंबईतून कोकेन, ब्राऊन शुगरची तस्करी पुण्यात करत होते. त्यानंतर शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजवडीतील उच्चभ्रू परिसरात त्यांची विक्री करतात. तर गांजाची राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेशातून पुणे, मुंबई शहरात पुरवला जातो. हिमाचल प्रदेशातून रेल्वेमधून अफीम पुण्यात दाखल होते. त्यानंतर तस्कर त्याची आपल्या नेटवर्कमार्फत विक्री करत असत.

पुण्यात नशेचा बाजार

कॉलेज तरुण- तरुणींना एलएसडी (स्टॅम्प) या अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी डार्कवेबद्वारे अमली पदार्थ खरेदी करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 1 कोटी 14 लाखांचे स्टॅम्प जप्त केले होते. त्यामुळे पुण्यात डार्कनेटवर्कद्वारे नशेचा बाजार भरत असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी उच्चशिक्षित पाच तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे विक्री

फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे पुण्यातील कॉलेज तरुण- तरुणींना अमली पदार्थांची विक्री करणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपूर्वी (एक) अटक केली होती. त्यांच्याकडून 51 लाख 60 हजार रुपये रकिमतीचे एलएसडी स्टॅम्प (17 ग्रॅम वजनाचे 1 हजार 32 तुकडे) जप्त केले होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या टोळीने ही शक्कल लढवली होती. व्हॉट्स अ‍ॅपद्वारे संपर्क साधल्यानंतर डिलिव्हरी देण्यासाठी ते फूड अ‍ॅपद्वारे पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने ऑर्डर बुक करत होते. समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करून पाठवले जात होते. त्यामध्ये काय आहे हे डिलिव्हरी बॉयला माहीत नसते. मात्र, ही टोळी त्याचद्वारे अमली पदार्थाची विक्री करत होती. पोलिसांना त्याची चाहूल लागल्याने टोळीचा पर्दाफाश झाला.

राजस्थानी तस्कर आघाडीवर

गेल्या काही दिवसांपासून गांजा तस्करीत राजस्थानी तस्करांचा अंमल वाढताना दिसत आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईतून हे समोर आले आहे. इतर अमली पदार्थांच्या तुलनेत गांजा सहज आणि कमी पैशात उपलब्ध होतो. त्यामुळे अनेक पार्ट्यांत पार्टी ड्रग म्हणून गांजाचा वापर केला जातो.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news