पुरंदरवर दुष्काळाचे सावट; पाणीटंचाईची तीव्रता वाढली : गावांची टँकरची मागणी

पुरंदरवर दुष्काळाचे सावट; पाणीटंचाईची तीव्रता वाढली : गावांची टँकरची मागणी
Published on
Updated on

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पाण्याचा मोठा प्रश्न आगामी काळात भेडसावणार आहे. मात्र, दुष्काळावरील उपाययोजना करण्याकडे प्रशासन उदासीन असल्याचे दिसते. सध्या तालुक्यातील 19 गावांत जवळपास 25 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने पुरंदर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्रीय समितीने दुष्काळाची दाहकता तपासली.

मात्र, दुष्काळाबाबतच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पाण्याअभावी शेती संकटात सापडली आहे. पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, विविध गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. परंतु, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पुरंदर तालुक्यातील बहुतांश पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत. गराडे, नाझरे धरणाचा पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. विहिरी, कूपनलिका व छोटे-मोठे बंधारे कोरडे पडले आहेत. टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्यातील एकूण 10 गावठाणांसह 129 वाड्यांवरील 38 हजार 224 लोकसंख्येला सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आली. दहा गावांकडून टँकरची मागणी करण्यात आली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून टँकर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भाग, वन्यप्राणी, पक्षी व पाळीव प्राण्यांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिंगोरी येथील शिंदेनगर, कवडेवाडी, वाल्हे येथील मुलामखी, वरचा मळा, मधला मळा, अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, वागदरवाडी,वा ळुंज, निळुंज, बनकरवस्ती, राऊतमळा, पिलावळी, नावळी, सोनवनेवस्ती, चतुरमुख महादेव मंदिर वारवडी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदान आदी ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टँकर सुरू असलेली गावे

वाल्हे, दौंडज, सोनोरी, वागदरवाडी, रिसे, पिसे, राजुरी, साकुर्डे, जवळार्जुन, दिवे, झेंडेवाडी, साकुर्डे, पांडेश्वर, खळद, बोपगाव, नायगाव.

टँकरची मागणी असलेली गावे

आंबळे, सिंगापूर, गुर्‍होळी, राख, नावळी, मावडी क. प., आडाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी.

प्रशासनाने पाण्याची गरज लक्षात घेऊन अधिकाधिक पाण्याचे टँकर उपलब्ध करावेत तसेच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणी, चारा डोपो लवकरात लवकर सुरू करावेत.

सीमा भुजबळ, सरपंच, दौंडज

सध्या 19 गावे व संबंधित वाड्यांना एकूण 25 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात आणखी काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

सचिन घुबे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news