आ. दत्तात्रय भरणेंच्या निवासस्थानी सकल मराठा समाजाचा आजपासून ठिय्या | पुढारी

आ. दत्तात्रय भरणेंच्या निवासस्थानी सकल मराठा समाजाचा आजपासून ठिय्या

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी चालू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ इंदापूर तालुका सकल मराठा समाजातील काही बांधव शनिवार (दि. 17) पासून माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत. यासंदर्भातील लेखी निवेदन इंदापूर तहसील कार्यालयास शुक्रवारी (दि. 16) देण्यात आले. शुक्रवारी दुपारी सकल मराठा समाजाची शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली.

तीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर नगरपरिषदेसमोरील प्रांगणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
आ. भरणे यांनी दि. 20 रोजी होणार्‍या विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षण समर्थनार्थ आवाज उठवावा, यासाठी त्यांच्या अंथुर्णे (भरणेवाडी) येथील निवासस्थानासमोर महादेव सोमवंशी, रोहित पाटील, सोमनाथ दशरथ जाधव आणि पवन घोगरे हे ठिय्या आंदोलन करणार आहेत. तसेच कांदलगाव येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण भरणेवाडी येथे सुरू केले जाणार आहे. उपोषणकर्ते बंडू गोपाळ ननावरे आणि सौदागर बाळासाहेब ननवरे हे देखील भरणे यांच्या निवासस्थाना समोर बेमुदत उपोषण करणार आहेत.

हेही वाचा

Back to top button