‘ससून’चा तावरे, कोणासही न आवरे! डॉ. तावरेकडून पोलिसांना तपासात सहकार्य नाहीच

‘ससून’चा तावरे, कोणासही न आवरे! डॉ. तावरेकडून पोलिसांना तपासात सहकार्य नाहीच

Published on

[author title="प्रज्ञा केळकर-सिंग" image="http://"][/author]

पुणे : ससूनमधील 'बडा' आणि 'कामाचा' अधिकारी म्हणून डॉ. अजय तावरेची अनेक वर्षांपासून ओळख! तावरेशी ओळख असेल, तर शवविच्छेदनाचे अहवाल बदलण्यापासून रुग्णाला तातडीने 'व्हीआयपी' सेवा देण्यापर्यंत अनेक कामे चुटकीसरशी होतात, अशी तावरेची ख्याती… मात्र, त्याचा खरा चेहरा समोर आला तो कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलण्याचे धाडस केल्यावर! त्यामुळे 'ससूनचा तावरे, कोणासही न आवरे' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अपघात प्रकरणाला आज एक महिना पूर्ण होत असतानाही अटकेत असलेल्या तावरेकडून अद्याप पोलिसांना सहकार्य मिळालेले नाही.

ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली. मात्र, त्यातूनही रुग्णालय प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. त्यानंतर पुन्हा ससून चर्चेत आले ते तावरेच्या प्रतापामुळेच! कल्याणीनगरमध्ये 19 मेच्या मध्यरात्री मद्यधुंदावस्थेत अल्पवयीन बिल्डरपुत्राने बेदरकारपणे गाडी चालवत दुचाकीवरील तरुण-तरुणीला उडविले आणि दुर्दैवाने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर काही तासांमध्येच म्हणजे 20 मे रोजी सकाळी 11.30 वाजता आरोपीला रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात आणले. आरोपीचे वडील, आमदार यांच्याशी संगनमत करून डॉ. तावरेने आरोपीच्या रक्ताचे नमुने कचर्‍यात फेकून दिले आणि त्याऐवजी आरोपीच्या आईचे रक्ताचे नमुने घेतले. 'हिट अँड रन' प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना ही धक्कादायक बाब समजली. पोलिसांनी 26 मे रोजी डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली.

ललित पाटील प्रकरण, उंदीर चावा प्रकरण ताजे असतानाच रक्तनमुना बदलल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यावर ससूनवर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली. तरीही ससूनचे माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. पत्रकारांना उडवाउडवीची उत्तरे देत त्यांनी आपल्याला या प्रकरणाबाबत काहीही माहीत नसल्याचे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशीबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगितले.

चौकशी समिती स्थापन

वैद्यकीय शिक्षण विभागाने गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 27 मे रोजी त्रिसदस्यीय समिती नेमली.
समितीने 28 मे रोजी ससून रुग्णालयाला भेट देऊन अधिष्ठात्यांसह अनेकांचे जबाब नोंदवून घेतले. या
प्रकरणाची तब्बल आठ तास चौकशी केली. त्याच दिवशी समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला. यामध्ये अधिष्ठात्यांनी प्रकरण गांभीर्याने न हाताळणे, आरोपी आणि सामान्य रुग्णांच्या नोंदी वेगवेगळया रजिस्टरमध्ये न ठेवणे, अशा अनेक त्रुटींवर बोट ठेवण्यात आले.

डॉ. तावरे, डॉ. हाळनोरला अटक

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आदेशाने 29 मे रोजी डॉ. अजय तावरेला निलंबित करण्यात आले. डॉ. तावरेने दहा दिवसांची रजा टाकली होती. तो 22 मे रोजी कामावर हजर होणार होता. मात्र, 21 मे रोजी तो रुग्णालयात आल्याचे बायोमेट्रिक नोंदीवरून स्पष्ट झाले. डॉ. हाळनोरची सेवा समाप्त करण्यात आली. शिपाई अतुल गटकांबळेलाही निलंबित करण्यात आले. प्रकरण गांभीर्याने न हाताळल्याबद्दल ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

ससूनच्या कामकाजाचा लेखाजोखा सादर

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार ससून रुग्णालयात घडला. त्यामुळे ससूनच्या कामकाजावर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ससूनची डागाळलेली प्रतिमा सुधारावी आणि कामकाजात पारदर्शकता, सुसूत्रता यावी, यासाठी विशेष समितीकडून 117 पानांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी डॉ. मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली होती. आपत्कालीन विभागामधील गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.

डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

ससूनमध्ये 29 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. विनायक काळे यांनी जबाबदारी झटकली. तावरेची कारकीर्द वादग्रस्त असूनही वैद्यकीय अधीक्षकपद सोपविण्यात आले. डिसेंबर 2023 मध्ये डॉ. तावरे याच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांचे शिफारसपत्र आणि त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा शेरा असल्यामुळे डॉ. तावरेला पुन्हा अधीक्षकपद दिल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

पत्रकारांना उडवून लावणे, त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्रकारांनी केलेली तक्रार आणि दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषदेतील गोंधळ, काळेंनी हसन मुश्रीफ यांचा केलेला उल्लेख, यामुळे डॉ. काळे यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news