भावी पोलिस आक्रमक; भरतीसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

भावी पोलिस आक्रमक; भरतीसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात 19 जूनपासून 17 हजार पदांसाठी पोलिस भरती करण्यात येत आहे. ही भरती शासनाने 2022- 23 मध्ये करणार असल्याचे सांगितले होते. परंतु ही भरती 2024 मध्ये होत आहे. भरती प्रक्रियेस उशीर झाला असल्याने अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलटून गेली आहे. त्यामुळे भरतीमध्ये सहभाग घेण्यास ते अपात्र ठरत आहेत. या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत वयोमर्यादा वाढवून एक संधी मागितली आहे.

शासनाच्या बोंगळ कारभारामुळे उमेदवारांचे नुकसान

विद्यार्थी म्हणाले, पोलिस भरतीकरिता उमेदवारांना वयाची अट वाढवून मिळावी. आम्हाला एक संधी हवी आहे. तसेच पावसाळ्यात मैदानी चाचणी देणे शक्य नाही. मागील सात ते आठ महिने आम्ही अनेक लोकप्रतिनिधी यांना निवेदन देत आहोत. परंतु आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार कोरोना, सदोष मागणी पत्रे किंवा मागणी पत्रे न पाठविणे यामुळे अनेक पदांच्या भरतीसाठी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाहीत. यामुळे भरती प्रक्रिया रखडली.

परिणामी वयोमर्यादा ओलांडल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षेला बसण्याच्या संधी गमावल्या. पोलिस भरतीची जाहिरात 31 डिसेंबरपूर्वी निघणे अपेक्षित असताना, ही जाहिरात फेब्रुवारीत काढण्यात आली. या तीन महिन्यांत अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. वयाची अट पूर्ण होऊ शकत नसल्याने दीड लाख विद्यार्थी भरतीपासून वंचित रहाणार आहेत. 2022-23 मधीलच वयोमर्यादा लागू केली पाहिजे असेही विद्यार्थी म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news