

Pune Graduate Constituency Election 2026 Smita Jadhav
पुणे : भाजप-महायुतीने मला तरुण आणि पदवीधरांसाठी काम करण्याची मोठी संधी दिली आहे. गेली २० वर्षे मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या आकांक्षा, त्यांचे प्रश्न आणि रोजगाराच्या संधी यांचा जवळून अभ्यास केला आहे. आता व्यापक पातळीवर काम करण्याची संधी मिळत आहे. शिक्षण क्षेत्रातील काम केल्याचा अनुभव पदवीधर, तरुण आणि नवउद्योजकांसाठी वापरणार असून, स्टार्टअप, इन्क्युबेशन सेंटर आणि कौशल्य विकास या मुद्द्यांवर विशेष भर देणार असल्याची ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी सोमवारी पुणे विधान भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. जाधव म्हणाल्या, ''भाजप आणि महायुतीने आपल्याला तरुणांसाठी आणि पदवीधरांसाठी काम करण्याची संधी दिली आहे. गेल्या दोन दशकांपासून आपण शिक्षण क्षेत्रातच कार्यरत असून, तरुणांच्या ध्येयासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी काम केले आहे. आता या माध्यमातून अधिक व्यापक पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने मी करणार आहे. पदवीधरांसाठी प्रामुख्याने रोजगार आणि कौशल्य विकासावर विशेष भर देणार आहे. तरुणांच्या स्टार्टअपला चालना देणे, इन्क्युबेशन सेंटर विकसित करणे आणि कौशल्य विकासासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पदवीधरांना बदलत्या रोजगाराच्या संधींनुसार आवश्यक कौशल्य आणि ज्ञान उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.''
''पुणे पदवीधर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाचही जिल्ह्यांची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आणि प्रत्येक क्षेत्राचा स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज आहे. सांगलीमध्ये कृषीक्षेत्राशी संबंधित संधी आणि आव्हाने आहेत, तर कोल्हापूरमध्ये आयटी तसेच औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत आहे. पुण्यात तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहे. या प्रत्येक क्षेत्राला आवश्यक असलेले कौशल्य, ज्ञान आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सोलापूर हा संपूर्ण पट्टा मोठा आहे. प्रत्येक जिल्ह्याची आणि प्रत्येक क्षेत्राची गरज वेगळी आहे. त्या-त्या क्षेत्राला आवश्यक असलेले स्किलिंग, ज्ञान आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत,'' असे जाधव यांनी सांगितले.
'मामांचा आशीर्वाद नेहमीच आहे'
''काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी असलेल्या कौटुंबिक नात्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, ''मामांनी मला नेहमी समाजासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा दिली आहे. चांगल्या कामासाठी ते नेहमी प्रोत्साहन देत आले आहेत. मामांचा आशीर्वाद नेहमीच असतो आणि कायम राहील,'' असे त्या म्हणाल्या.
पदवीधरांसाठी स्मिता जाधव यांचा कृती कार्यक्रम
तरुणांच्या नव्या व्यावसायिक संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्याबरोबरच पदवीधरांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर विकसित करण्यावर भर देणार असल्याचे डॉ. स्मिता जाधव यांनी सांगितले. बदलत्या रोजगाराच्या गरजांनुसार तरुणांना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन जिल्हानिहाय आणि क्षेत्रनिहाय नियोजन करण्यात येईल. सांगलीतील कृषीक्षेत्र, कोल्हापूरमधील आयटी व औद्योगिक क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्राला आवश्यक असलेले कौशल्य, ज्ञान आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्यावर भर राहील. शिक्षणानंतर तरुणांना रोजगार, उद्योजकता आणि स्वयंरोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देत त्यांच्या आकांक्षांना योग्य दिशा देण्यासाठी काम करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या प्रश्नांवर लढा देणार; कौस्तुभ गावडे यांची ग्वाही
पुणे शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. जुनी पेन्शन, टीईटी सक्तीमुळे निर्माण झालेले प्रश्न, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा आणि संचमान्यतेच्या कठोर निकषांमुळे अतिरिक्त होणारे शिक्षक हे प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले. गावडे म्हणाले, 'मी स्वतः शिक्षक असून, शिक्षण क्षेत्राशी माझ्या कुटुंबाचा पाच पिढ्यांचा संबंध आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची मला प्रत्यक्ष जाण आहे. विधानभवनात हे प्रश्न प्रभावीपणे मांडून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.' महायुतीतील नाराजी दूर होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मंगेश चिवटे आणि इतर इच्छुक नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. शिक्षक मतदारसंघातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.