आळंदी: पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी कैवल्याचा पुतळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमीला गुरुवारी (दि. 19) रात्री 8 वाजता प्रस्थान होणार आहे. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
देवस्थान, पालिका आणि पोलिस प्रशासन सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे असून, मंदिरात पुष्पसजावटीची लगबग सुरू आहे. भाविकांना घरबसल्या देखील सोहळा पाहता येणार असून, देवस्थानतर्फे याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा बसविण्यात आली असून, पासधारक व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. (Latest Pune News)
प्रस्थानाच्या दिवशी पहाटे चार ते साडेपाच घंटानाद, काकड आरती व पवमानाभिषेक होईल. सकाळी नऊ ते अकरा वीणामंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा मंदिराचा गाभारा स्वच्छ करण्यात येईल व समाधीस पाणी घालण्यात येईल व श्रींना महानैवेद्य, दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत भाविकांना दर्शन खुले असेल.
सायंकाळी पाच ते सात माउलींची नित्य गुरुवारची पालखी मिरवणूक पार पडेल. सायंकाळी सहा ते साडेसहा मानाच्या 47 दिंड्या आत घेण्यात येतील. रात्री आठ वाजता मुख्य प्रस्थान कार्यक्रमास सुरुवात होईल. श्रीगुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती, संस्थानतर्फे श्रींची आरती करण्यात येईल. त्यानंतर प्रमुख मानकर्यांना नारळप्रसाद वाटप, वीणामंडपात श्रींच्या चलपादुका आणल्या जातील. संस्थानतर्फे मानकर्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येतील.
श्रीगुरू हैबतबाबातर्फे प्रतिनिधी, दिंडीप्रमुख, प्रतिष्ठित मानकरी यांना नारळप्रसाद वाटप करण्यात येईल. पादुकांचे वीणामंडपातून प्रस्थान व मंदिरप्रदक्षिणा करून दर्शनमंडप हॉल, गांधीवाडा येथे विराजमान करण्यात येतील. समाजारती, रात्री अकरा ते पहाटे साडेचार जागराचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर शुकवारी (दि. 20) सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.
गुरुवारी पालखी मिरवणूक असल्याने यंदा उशिरा प्रस्थान
दरवर्षी पालखीचे सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान होत असते. यंदा मात्र पालखी प्रस्थान सोहळा गुरुवारी आला आहे. दर गुरुवारी सूर्यास्तानंतर माउलींची मंदिरात पालखी मिरवणूक निघत असते. यावर्षीही मिरवणूक झाल्यानंतरच प्रस्थान सोहळा होणार आहे. यामुळे यंदा प्रस्थान रात्री आठ वाजता होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी सांगितले.