

पुणे: दोन दिवसापासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणांत पाणी वाढत असून जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारे पूरग्रस्त भाग तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहे. (Latest Pune News)
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम मंडळ जलसंपदा, आरोग्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदल, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आदी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पूरस्थिती टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज
‘पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. पूरस्थिती ओढावू नये यासाठी पाटबंधारे विभागासह योग्य नियोजन केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जाणीवपूर्वक खडकवासला धरण निम्मे रिकामे ठेवण्यात आले होते. पूरस्थिती निर्माण होऊ नये हा आमचा त्या मागचा उद्देश होता. आमचा उद्देश सफल झाला. शहरात कुठेही पूरस्थिती निर्माण झाली नाही,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी दिली.