Eco-friendly Ganpati
बाणेर: माझा बाप्पा किती गोड दिसतो... माझा मोरया किती गोड दिसतो... असे म्हणत स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक शाडू मातीने गणपती बनविण्याचा आनंद बालेवाडी येथील सी. एम. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज घेतला.
गणपतीच्या मूर्ती बनविण्यामध्ये ही निरागस मुले अगदी गुंतून गेली होती. प्रत्येक बनविलेल्या मूर्तीत वेगळाच हावभाव व प्रसन्नता दिसून आली. याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने घरीही शाडू मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करून यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार असल्याची ग्वाही दिली. (Latest Pune News)
दै. ‘पुढारी’च्या वतीने ’माझा बाप्पा शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणाची स्फूर्ती’ या पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन बालेवाडी येथील सी. एम. इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेला पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष सहकार्य लाभले असून, या कार्यशाळेचे मुख्य प्रायोजक सॉलिटर ग्रुप, तर सहप्रयोजक गोयलगंगा ग्रुप आहे. एज्युकेशन पार्टनर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, एन्व्हॉयर्मेंट पार्टनर ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि. आहेत.
स्वतःच्या हाताने लाडक्या बाप्पाची मूर्ती घडविण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत घेतला. या वेळी विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्टचे प्राध्यापक सुनील देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले आणि प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा शाडू मातीची मूर्ती कशी पर्यावरणपूरक आहे, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
शाडू मातीचा उपयोग आपण मूर्ती विसर्जन केल्यावर आपल्या घरातील कुंडीत व कुठेही करू शकतो. यामुळे नदीचे प्रदूषण कमी होणार असल्याचेही विद्यार्थ्यांना समजाविण्यात आले. या वेळी सी. एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य इक्बालकौर राणा, कार्यक्रमाचे समन्वयक अमिता निकाळजे-यादव, हिंदवी चांदेरे, चेतना डुंभरे यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्यात मदत केली.
गणपती बाप्पाची मूर्ती शाडू मातीची असणे अत्यंत आवश्यक आहे. या मूर्ती आपण नदी, तलाव किंवा विहिरीमध्ये विसर्जन करतो. त्यामुळे प्रदूषणाबरोबर बाप्पाची अवहेलना होते. मातीची मूर्ती आपण घरातही विसर्जन करू शकतो. यामुळे मूर्तीचे पावित्र्य राखले जाईल आणि पर्यावरणसंवर्धनास मदत होईल, म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे. त्याचा उपयोग पर्यावरणसंवर्धनासाठी निश्चित होईल.
-डॉ. सागर बालवडकर, सचिव, एस. के. पी. शिक्षण संस्था
शाळेत आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि बाप्पांच्या निर्मितीचा आनंद अनुभवला. या उपक्रमातून मुलांना निसर्गाची जपणूक करण्याचा संदेश मिळाला. पर्यावरणपूरक उपक्रमासाठी शाळा सदैव तयार असते. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात दै. ’पुढारी’चा मोठा वाटा आहे. शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार.
- इक्बालकौर राणा, प्राचार्या, सी. एम. इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी