

Pune Rain Update News
पुणे: गेल्या तब्बल48 तासांपासून पुण्यात संततधार सुरू असून, श्रावणात प्रथमच यंदा मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्याला बुधवारी रेड, तर गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यासह धरण परिसरात अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीपात्रात 35 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने मंगळवारी रात्री 7 वाजता घेतला.
दरम्यान, कमाल-किमान तापमानात अवघ्या 1 ते 4 अंशाचे अंतर उरले तसेच आर्द्रता 97 ते 100 टक्क्यांवर गेल्याने शहरात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. सोमवारी शहरात मध्यम ते संततधार पावसाने बहार आणली. मंगळवारीदेखील पहाटेपासून शहरावर जोर‘धार’ सुरूच राहिल्याने सलग दुसर्या दिवशी पुणेकरांची दाणादाण उडाली. (Latest Pune News)
शहरातील सर्व पेठा आणि उपनगर भागांतील रस्ते जलमय झाले. सर्वत्र खड्डे, चिखल आणि वरून पडणार्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 48 तास संततधार पावसामेळे पुणेकर हैराण झाले.
ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली पाण्याखाली
शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याने भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. मुठा नदीच्या पाण्याने ओंकारेश्वर मंदिरात पाणीच पाणी झाले आहे.मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे . खडकवासला धरणातून सध्या 35000 पाण्याचा विसर्ग होत असल्याने मुठा नदी ओव्हर फ्लो झाली आहे.
प्रेमनगर झोपडपट्टीमध्ये शिरले पाणी
पुलाची वाडी येथील प्रेमनगर झोपडपट्टीमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे त्यामुळे येथील नागरिकांना स शेल्टर होममध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
खिलारे वस्तीत पाणी
तसेच खिलारे वस्ती भागात देखील पाणी शिरले आहे. येथील स्थानिक रहिवाशांना महापालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून पूर्ण परिसरात ये-जा करायला बंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिका अग्निशमन दलाची आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालय यांची यंत्रणा आहे.
एकता नगरमधील सोसायटीत पाणी
खडकवासला धरणातून सोडलेले पाणी पुण्यातील एकता नगरमधील शिवपुष्प चौकातील सोसायटीत शिरले आहे. एकता नगरी मधील ४ सोसायट्यांच्या पार्किंग मधे पाणी शिरलं आहे. एकता नगरी मधून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन वृद्ध आजी आजोबांना बाहेर काढले.
स्थानिक रहिवासी म्हणतात...
दरवेळी पाणी सोडले की आमच्या इमारतींमध्ये शिरते. यात आमचे आर्थिक नुकसान होते. याबाबत काहीतरी ठोस उपाययोजना करून प्रशासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी भूषण आंबेडे, केदार दिवेकर, संतोष कुंभार (शारदा सरोवर सोसायटीतील रहिवासी), उन्मेष वैद्य, उज्ज्वला बोबडे (जलपूजन सोसायटी) यांनी केली आहे.
कश्यप सोसायटीत शिरलेले पाणी काढले...
मंगळवारी दुपारच्या सुमारास येथीलच कश्यप सोसायटीमध्ये पाणी शिरले होते. दीड ते दोन फुटांपर्यंत येथे पाणी शिरले होते. ते पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पाणी काढण्यात आले. मात्र, सायंकाळी धरणातील विसर्ग वाढल्यामुळे पुन्हा येथे पाणी शिरले होते.