पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत 'प्रधानमंत्री जनमन' कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नरमधील मढ येथे करण्यात आले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी बांधवांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रक्षेपण दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले.
प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांना शिधापत्रिका वाटप, जातीचे दाखले वाटप, बँक खाते उघडणे, त्यांच्यासाठी पक्के घरकुल, कातकरी लोकांसाठी मच्छीमारीसाठी जाळे, वीट भट्टीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान आदी देण्यात आले. बँजो पार्टीसाठी चार लाख रुपये आधी विकास फाउंडेशन यांना देण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगातून मच्छी जाळीचे वाटप मढ ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, तहसीलदार रवींद्र सबनीस, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके, मढच्या सरपंच अरुणाताई मस्करे आदी उपस्थित होते.
हेही वाचा