पिंपरी : शुल्क आकारता, मग सुविधांचे काय ? उद्यानांत आवश्यक सुविधा नसल्याने नागरिकांची नाराजी

पिंपरी : शुल्क आकारता, मग सुविधांचे काय ? उद्यानांत आवश्यक सुविधा नसल्याने नागरिकांची नाराजी
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहरातील सर्व उद्याने खासगी तत्वावर चालविण्यास देण्यात येत आहेत. उद्यानाचे नूतनीकरण करून सुशोभीकरण करण्यात येत आहे. पालिकेच्या अनेक उद्यानांना तिकीट लावण्यात आले आहे; मात्र शुल्क आकारूनही उद्यानांत आवश्यक सुविधा का दिल्या जात नाहीत, अशी विचारणा करत नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

शहरभरात पालिकेची एकूण 159 सार्वजनिक उद्याने आहेत. सर्व उद्याने वेगवेगळ्या रचना व आकाराची आहेत. उद्यानांची चांगल्या प्रकारे निगा व देखरेख करता यावी म्हणून पालिकेने कृषी महाविद्यालयाचे प्रशिक्षण घेतलेले सुमारे 100 माळी नेमले होते. त्यामुळे शहरातील उद्याने सुंदर व स्वच्छ दिसत आहेत. तसेच, अनेक उद्यानांचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले.

पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून बांधलेली उद्याने आता ठेकेदारांकडे देखभालीसाठी देण्यात येत आहेत. त्यांच्याकडून व्यवस्थित निगा राखली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सुशोभीकरण व नूतनीकरणाचा खर्च वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत. सुरक्षारक्षकही जागेवर नसतात.

वीस रुपये तिकीट काढून उद्यानात आल्यानंतर पिण्यासाठी पाणी व्यवस्था तसेच, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. लहान मुलांचे खेळणी तुटलेली असतात. पाणी अधिक मारल्याने काही भागात चिखल झालेला असतो. चिखलातून नागरिकांना ये-जा करावी लागते. विक्रेते उद्याने खाद्यपदार्थ विकत खुलेआम फिरत असतात. ठेकेदारांचे कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे बोलतात. त्यामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

तळवडे उद्यानाची देखभाल

तळवडे येथील गायरान उद्यान देखभालीचे काम दिशा स्वयंरोजगार संस्थेला देण्यात आले आहे. दीड वर्षांसाठी 11 लाख 83 हजार खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या तळवडे उद्यानातील पॉलिहाऊस प्रकल्प देखभालीचे कामही दिशा संस्थेला देण्यात आले आहे. दीड वर्षे कालावधीसाठी 28 लाख 54 हजार खर्च अपेक्षित आहे.

ही उद्याने ठेकेदारांकडे ग क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 24 व 27 भागातील महापालिकेचे सार्वजनिक उद्याने देखभालीसाठी न्यू गार्डन गुरूज फार्म अ‍ॅर्ण्ड नर्सरीला देण्यात आले आहेत. त्यासाठी 50 लाख 48 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम दीड वर्षे कालावधीसाठी आहे. क क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 2 व 8 भागातील उद्याने देखभालीसाठी तुळजाभवानी सर्व्हिसेला देण्यात आले आहे. दीड वर्षांसाठीच्या या कामासाठी 44 लाख 80 हजार खर्च अपेक्षित आहे.

ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 22 व 23 भागांतील उद्यानांची देखभाल करण्यासाठी 52 लाख 92 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम दीड वर्षांसाठी जी. बी. एंटरप्रायजेसला देण्यात आले आहे. फ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 1 व 11 मधील विविध उद्याने देखभालीसाठी 37 लाख 38 हजार खर्च अपेक्षित आहे. हे काम दीड वर्षांसाठी न्यू भारतीय अ‍ॅग्रो या एजन्सीला देण्यात आले आहे.

काही उद्यानांचे नूतनीकरण

शहरातील ड आणि ह क्षेत्रीय कार्यालय परिसरातील उद्यानांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 41 लाख 82 हजार खर्च अपेक्षित आहे. पाच महिने मुदतीचे हे काम निसर्ग लॅण्डस्केप प्रा. लि. ला देण्यात आले आहे. क आणि ई क्षेत्रीय कार्यालय परिसरातील उद्यानांचे नूतनीकरणाचे काम निसर्ग लॅण्डस्केललाच देण्यात आले आहे. त्यासाठी 42 लाख 25 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. त्या कामासाठी 5 महिन्यांची मुदत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news