

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे साखर संकुलमधील एका बैठकीनिमित्त रविवारी (दि. 1) पुन्हा एकत्र आले. बैठकीनंतर त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील आलेला दुरावा आता जवळपास वरिष्ठपातळीवर विरघळल्यातच जमा आहे. त्याचा प्रत्यय रविवारी पुन्हा एकदा आला. (Latest Pune News)
कृषी क्षेत्र आणि ऊस शेतीमध्ये प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी व्हीएसआय येथे बैठक होती. त्या वेळी तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. काही वेळ तेथे कोणाला सोडण्यात येत नव्हते आणि त्यामुळे नेमक्या कोणत्या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली, याची उत्सुकता उपस्थितांमध्ये होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर अनेकदा काही कार्यक्रम आणि संस्थांशी संबंधित बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येत आहेत. बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह साखर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर इतर नेते निघून गेले. मात्र, शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.
वारंवार एकत्र येणे योगायोग की राजकीय गणिते?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एकत्र येतील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी वारंवार एकत्र येणे हा केवळ बैठकीतील योगायोग आहे की आणखी काही राजकीय गणिते दडली आहेत? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, बैठकीनंतर अजित पवार किंवा जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलण्याचेही टाळले.