

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सुमारे 12 दिवस आधी दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास रखडला असून, किमान 10 जूनपर्यंत हा प्रवास थांबलेला असेल. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. या कालावधीत केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागांत प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागांत मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे. परिणामी कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात 40 अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे; तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकर्यांनी पेरणीसह लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दरम्यान, सलग पाचव्या दिवशी रविवारी (दि. 1 जून) मान्सून मुंबई, पुणे, अहिल्यानगर शहरातच मुक्कामी होता. त्याने पुढे प्रगती केली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर तयार झालेल्या स्थितीमुळे काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. 3 ते 5 जून या कालावधीत विदर्भातच पावसाचा जोर असेल आणि 6 जूनपासून राज्यातून पावसाचा जोर पूर्ण कमी होत आहे. राज्यात मान्सूनची प्रगती 28 मेपासून खोळंबली आहे. हवेचे दाब अचानक 998 वरून 1005 हेक्टा पास्कल इतके वाढल्याने मान्सूनच्या वार्यांना ब्रेक लागला अन् तो मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागातच अडखळून बसला आहे. ही स्थिती 6 जूनपर्यंत राहिल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.
ठाणे (5), रत्नागिरी (2), सिंधुदुर्ग (2, 3), धुळे (4, 5), नंदुरबार (4), जळगाव (4,5), नाशिक (5), छत्रपती संभाजीनगर (5), अकोला (4,5), अमरावती (2), भंडारा (3 ते 5), बुलडाणा (4,5), चंद्रपूर (4,5), गडचिरोली (2 ते 5), गोंदिया (3 ते 5), नागपूर (4,5), वर्धा (2 ते 5), वाशिम (4,5), यवतमाळ (2 ते 5).