

भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने येत्या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या सभासदांच्या पूर्वहंगामी व सुरु उसाला प्रतिटन 75 रुपये व खोडवा उसाला प्रतिटन 100 रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे, अशी माहिती श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.(Latest Pune News)
कारखान्याचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होत असून, त्यादृष्टीने यंत्रसामग््राी देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्याची चाचणी ही घेण्यात येत आहे. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आडसाली 12,698 एकर, पूर्वहंगामी 1661 सुरु 2838 एकर व खोडवा 6580 एकर असा एकूण 23 हजार 777 एकर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. आडसाली उसाचे प्रमाण जास्त असल्याने कारखान्याचे दोन्ही प्रकल्प पूर्णक्षमतेने चालवून आडसाली उसाचे गाळप लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. पूर्व हंगामी, सुरु व खोडवा या उसासाठी तोडीस होणारा विलंब व त्यामुळे सभासदांचे होणारे आर्थिक नुकसान, याचा विचार करून उशिरा गाळप होणाऱ्या उसास वरीलप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जाचक, गावडे यांनी सांगितले.
सभासदांना कारखान्यास ऊस गाळपास देण्यासाठी असलेल्या अडचणीचा विचार करून येत्या गळीत हंगामात सभासदांचा ऊस वेळेत तुटेल अशा पद्धतीचे ऊसतोडणीचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. ऊसबिलातून सभासदांची कारखाना येणे बाकी यावर्षी कपात केली जाणार नाही. शेअरची बाकी असेल तर त्याच्या कपातीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ही मुदतवाढ अंतिम असेल व त्यानुसार शेअरची रक्कम तीन हंगामात टप्प्याटप्प्याने कपात केली जाणार असल्याने सभासदांवर जास्तीचा आर्थिक ताण पडणार नाही. कारखान्याच्या ऊस गाळप व साखर उतारा, यामध्ये वाढ झाली, तरच कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडेल, ही जाणीव ठेवून सभासदांनी आपला चांगल्या प्रतीचा ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
या वेळी कारखान्याचे संचालक ॲड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ उपस्थित होते.