नारायणगाव: मे महिन्यात पडलेल्या अतिपावसाचा टोमॅटो पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पिकावर मोठ्या प्रमाणात किडी आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्पादन घटल्याने शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यात भर म्हणजे टोमॅटोचे बाजारभाव देखील गडगडले आहेत. 22 किलो वजनी टोमॅटोचे क्रेटला अवघा शंभर ते चारशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.
दर वर्षाप्रमाणे यंदाही जुन्नर तालुक्यामध्ये टोमॅटोची उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे या टोमॅटो उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक टोमॅटोच्या बागा शेतकर्यांनी उपटून टाकल्या आहेत. तिरंगा, खर्डा, चिरटा या विषाणूजन्य व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला आहे. (Latest Pune News)
सतत पंधरा दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने टोमॅटोची फळे काळी पडली आहेत. टोमॅटो रंगीबेरंगी होण्याचे प्रमाण वाढले आहे. फळे चिरटली आहेत. या सर्वामुळे टोमॅटोला व्यापारी खरेदी करीत नाहीत. वडीच्या भावाने व्यापार्यांकडून या टोमॅटोला मागणी होत आहे, तर चांगला बाजारभाव मिळत नसल्यामुळे काही शेतकरी बाजारात विक्रीला आणलेले टोमॅटो पुन्हा घरी घेऊन जात आहेत.
उन्हाळ्यामध्ये टोमॅटोचे पीक जगवण अतिशय अवघड काम असते. तीव्र ऊन व पाण्याची कमतरता, यावर मात करून शेतकर्यांनी टोमॅटोच्या बागा वाचविल्या होत्या. परंतु, मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे त्यावर पाणी फेरले गेल्याची खंत शेतकरी योगेश ज्ञानेश्वर भिसे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, दोन महिन्याचा बाग या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. टोमॅटोला चांगली फळे लागली होती. परंतु, जास्तीच्या पावसाने ही सगळी फळे काळी पडली असून, फळाला हात लावताच ती गळून पडत आहेत.
सध्या टोमॅटोला बाजारभाव देखील फारसा मिळत नाही. 100 रुपये ते 400 रुपयांदरम्यान 22 किलो वजनाच्या क्रेटला बाजारभाव मिळत आहे. या कमी बाजारभावामध्ये टोमॅटोची तोडणी करणे आणि वाहतूक करणे शेतकर्याला परवडत नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी मे महिन्यात आलेल्या पावसामुळे शेतकर्यांचा टोमॅटोचा हंगाम पूर्णपणे तोट्यात गेला आहे.