

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ई-शिधापत्रिका (ई-रेशनकार्ड) देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाफूड या संकेतस्थळावर जाऊन त्यासाठी अर्ज करावे लागणार आहे. मात्र, हे संकेतस्थळ वारंवार हँग होत असल्याने नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिका मिळण्यात अडचणी जाणवत आहे. पर्यायाने, ऑनलाइन शिधापत्रिका काढण्यासाठी सामान्य नागरिकांना शिधापत्रिका कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.
ई-शिधापत्रिका मिळण्यासाठी सध्या नागरिकांना विविध समस्यांचा डोंगर पार करावा लागत आहे. महाफूड हे संकेतस्थळ वारंवार हँग होत आहे. बंद पडत आहे. परिणामी नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिकेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
एजंटगिरीला अटकाव; पण..
सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्ड काढण्यासाठी शिधापत्रिका कार्यालयात जावे लागत होते. त्यामध्ये प्रत्येक वेळी विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येत होती. या प्रक्रियेत एजंटांचा शिरकाव झाला होता. त्यामुळे 20 रुपयांचे रेशनकार्ड काढण्यासाठी जादा रक्कम मोजावी लागत होती. मध्यस्थांचा हा शिरकाव कमी करण्यासाठी ई-रेशनकार्डची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, सध्या महाफूड संकेतस्थळावरुन ई-शिधापत्रिका काढण्यात अडचणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
शिधापत्रिका काढणे ठरतेय दिव्य
सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने महाफुड संकेतस्थळावर अर्ज करण्यास सांगितले आहे. मात्र, सध्या या संकेतस्थळावरून ही शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी अनेक नियम आहेत. त्याशिवाय, महा ई-सेवा केंद्रातूनही अर्ज भरण्याबाबत पुरेशी माहिती नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांना शिधापत्रिका कार्यालयात माहिती घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. पर्यायाने ई-शिधापत्रिका मिळविणे हे मोठे दिव्य ठरु लागले आहे. दरम्यान, याबाबत निगडी शिधापत्रिका कार्यालयातील परिमंडळ अधिकारी सचिन काळे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, ते उपलब्ध झाले नाही.
हे ही वाचा :